नाशिककर! झाड तोडताय, मग भरावा लागेल ‘इतका’ दंड

नाशिक । प्रतिनिधी
नाशिक शहरात आजही अनेक ठिकाणी हिरवळ पाहायला मिळते. मात्र अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामासाठी सर्रास वृक्षतोड केली जाते. यावर अनेकदा महापालिकेकडून यावर कारवाई देखील करण्यात आली आहे. मात्र यापुढे जात महापालिकेने कठोर पाऊले उचलली असून आता वृक्ष तोड केल्यास एक लाखांपर्यंत दंड भरावा लागणार आहे.

एकीकडे नाशिक स्मार्ट होत असतांना दुसरीकडे मात्र वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जात आहे. यासाठी महापालिकेने शहरात बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई सुरु केली आहे. जर बांधकामासाठी अनधिकृत वृक्ष तोड केल्यास एक लाखांपर्यंत दंड भरावा लागणार असून याशिवाय बांधकामाची परवानगी देखील रद्द होणार आहे. यामुळे बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांना लगाम लागणार आहे.

शहरात होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात अनेक संघटनांनी यापूर्वी आवाज उठवला आहे. आता महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समोर तज्ञांनी याबाबत शिफारस केली आहे. यामध्ये त्यांनी बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच वृक्ष प्राधिकरणच्या शिफारशींना तात्काळ मंजूर करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. यासोबतच, वृक्ष तोडण्याची परवानगी देताना पर्यायी वृक्ष लागवड अनिवार्य करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी वृक्षांची कत्तल होईल त्या ठिकाणी झाड लावणे महत्वाचे ठरणार आहे.

नाशिकात शहरीकरण वाढत असून यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नवीन वृक्षारोपण करण्यासोबतच वृक्षतोड रोखण्याकडेही विशेष लक्ष दिले गेले पाहिजे.