नाशिक । प्रतिनिधी
नवरा बायकोच्या भांडणातून एकाने नाशिकच्या रामवाडी पुलावरून गोदावरी नदीत उडी घेतली होती. ही घटना २७ डिसेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घटना घडली होती. मात्र सदर तरुणाचा मृतदेह सापडला नव्हता. अखेर ३ दिवसांनंतर प्रशासनाला या तरुणाचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे.
दीपक परदेशी असे या तरुणाचे नाव आहे. दीपक आणि त्याच्या बायकोमध्ये खटके उडत होते. त्यामुळे दिपकची पत्नी हि फारकत घेण्यासाठी सांगत होती. फारकत घेण्यावरून त्या दोघांमध्ये न्यायालयात वादही सुरु होते. दरम्यान या विषयावर बोलण्यासाठी दीपक ने पत्नी कोमल हिला रामवाडीच्या पुलावर येण्यास सांगितले होते.
तीन दिवसांपूर्वी येथील रामवाडी पुलावर दीपक आणि कोमल या नवरा बायकोत कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाचा राग करीत दिपकने थेट गोदावरीत उडी घेतली होती. अग्निशमन दलाला माहिती मिळताच पंचवटी केंद्रावरील जवानांनी घटनास्थळी दाखल होत रबरी बोटीच्या साहाय्याने पाण्यात बुडालेल्या दीपक चा शाेध घेण्यास सुरुवात केली होती. मात्र अंधारात शोध घेण्यास अडचणी येत होत्या.
त्यांनतर दोन दिवस अग्निशमन दलाचे जवान दिपकचा शोध घेते होते. अखेर आज सकाळी दिपकचा मृतदेह सापडला असून याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे..