महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव

मुंबई । प्रतिनिधी

शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू (VP M Venkaiah Naidu) यांनी पत्र लिहित विरोधकांचा छळ करण्यासाठी सरकारकडून सक्तवसुली संचलनालयाचा (ईडी) वापर केला जात असल्याचा आरोप केला आहे.

सोबतच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी दबाव असल्याचंही सांगितलं आहे. राज्यात मध्यावधी निवडणूका व्हाव्यात यासाठी काहींनी त्यांची भेट घेतल्याचा खळबळजनक आरोप देखील करण्यात आला आहे. या प्रयत्नांना नकार दिल्याने धमकी येत असल्याचं, परिणामी राज्यसभेमध्ये मोकळेपणे बोलू नये असा आरोपही त्यांनी केला आहे.

संजय राऊत यांच्या कुटुंबामधून सुरूवातीला त्यांच्या पत्नीला ईडीने नोटिस धाडली होती त्यानंतर मागील काही दिवसांपूर्वी त्यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांच्यावरही कारवाई केली आहे. या कारवाईचा आधार घेत संजय राऊतांनी पत्र लिहले आहे. महिन्याभरापूर्वी काही लोक महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मदत करावी यासाठी आपल्याकडे काही जण आले होते. मध्यावधी निवडणुका व्हाव्यात यासाठी त्यांचा प्रयत्न केल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. मात्र आपण त्यांना अपेक्षित मदत केली नसल्याने कारवाई सुरु असल्याचा आरोप संजय राऊत यांनी पत्रामध्ये केला आहे.

दरम्यान संजय राऊतांच्या पत्रामध्ये कॅबिनेटमधील दोन वरिष्ठ मंत्री आणि अन्य दोन मंत्र्यांनाही पीएमएलए अंतर्गत जेलमध्ये टाकणार आहोत अशी धमकी देण्यात आल्याचा राऊतांचा दावा आहे. महत्वाचे नेते जेलमध्ये गेले की राज्यात मध्यावधी निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल असं राऊतांनी पत्रात लिहले आहे.