नाशकात निघणार मानाच्या दाजीबा वीरांची मिरवणूक, अशी आहे आख्यायिका

नाशिक | प्रतिनिधी
कोरोनाच्या सलग दोन वर्षांच्या खंडानंतर प्रथमच धुळवडीच्या दिवशी नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात दाजीबा वीरांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिककरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

होळीच्या दुसर्‍या दिवशी सर्वत्र धुळवडीचा सण साजरा होत असताना नाशिकमध्ये मात्र उद्या शुक्रवारी दाजीबा वीरांची मिरवणूक निघणार आहे.गेल्या दोन वर्षांपासून कोरोना मुळे वीरांची मिरवणूक काढता आली नव्हती, मात्र यंदा पोलिस आयुक्तांची परवानगी मिळाल्यास उत्साहात ही मिरवणूक काढण्यात येणार आहे.

दरवर्षी धुळवडीच्या दिवशी ही मिरवणूक निघते. शहरातील विविध भागातून एक ते दीड हजार वीर देव देवतांचे सोंग घेऊन वाजत-गाजत पाचपावली करत गोदावरी नदीत आपापल्या देवांना स्नान घालतात. नाशकातील महत्त्वाचा वीर म्हणून शंभर ते दीडशे वर्षांहून अधिक व तीन पिढ्यांपासून ची परंपरा असलेल्या दाजीबा वीरांची मिरवणूक सर्वांचे आकर्षण ठरते.

नवसाला पावणारा वीर अशी ओळख असल्याने नाशिककर मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी होत आपल्या मनातील इच्छा आकांक्षा दाजीबा महाराजांपर्यंत पोहोचवण्यासाठी बाशिंग, पाळणा व नारळ मिरवणुकीत अर्पण करतात.

दोन वर्षाचा कालावधी सोडला तर यंदा अकराव्या वर्षी या मिरवणूकीत समान प्रवीण दत्तात्रय भागवत यांना देण्यात आला आहे.

अशी आहे आख्यायिका

दाजीबा महाराजांची गाथा : दाजीबा महाराज हे गाई गुरे चारण्यासाठी बाहेर जायचे. दरम्यानच्या काळात त्यांचे लग्न ठरल्याने हळद लागली होती. ते गाई गुरे चारण्यासाठी अक्राळे फाटा येथे गेले असता दरोडेखोरांनी दागिने चोरण्याच्या उद्देशाने दाजीबांवर वार केले. त्यात त्यांचे प्राण गेले. काही वेळानंतर त्यांचा खंडेराव नावाचा श्वान नेहमीप्रमाणे त्यांचे जेवण घेऊन आला असता त्यांनी आपल्या मालकाला रक्ताच्या थारोळ्यात बघितले.

गावात असलेल्या माणसांना त्याने ओढून तेथे आणल्यावर गावकऱ्यांनी त्याच ठिकाणी दाजीबांना अग्निडाग दिला. श्वानाने व दाजीब महाराजांच्या होणाऱ्या पत्नीने देखील ते अग्नीत उडी मारत आपले प्राण त्यागले. त्यामुळे परंपरेनुसार मिरवणूक काढण्यात येते, असे सांगितले जाते.