नंदिनी पुलावर बसवली संरक्षक जाळी, आता निर्माल्य नदीत पडणार नाही!

नाशिक । प्रतिनिधी

सिडको परिसरातील दोंदे पुल आणि सिटी सेंटर मॉल सिग्नलजवळील पुलावर १२ वर्षांनी संरक्षक जाळी बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. परिसरातील रहिवाशांनी आणि शहरातील पर्यावरणप्रेमींकडून या कामाचे स्वागत केले जात आहे.

नाशिकच्या प्रभाग २४ मध्ये सिटी सेंटर मॉलच्या म्हसोबा मंदिराजवळ नंदिनी नदीवर पूर्वी छोटासा फरशी पूल होता. ऑगस्ट १९८८ मध्ये देवळालीचे तत्कालीन आमदार भिकचंद दोंदे हे मारुती कारसह पुरात वाहून गेले, त्यात त्यांचे दुर्दैवी निधन झाले. यानंतर सन १९९४ मध्ये येथे मोठा पूल बांधण्यात आला. या पुलाला दोंदे पूल असे नाव पडले.

तर गोविंदनगरकडे जाणार्‍या रस्त्यावर सिटी सेंटर मॉल सिग्नलजवळ महापालिकेने दुसरा पूल बांधला, २०११-१२ ला तो वाहतुकीसाठी खुला झाला. सिडको परिसरासह इतर नागरिक या दोन्ही पुलांवरून नंदिनी नदीत निर्माल्य, इतर घाण व कचरा टाकत असल्याने नंदिनीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत होते. हे थांबण्यासाठी या पुलांवर पर्यावरण निधीतून संरक्षक जाळी बसविण्यात यावी, अशी मागणी परिवाराण प्रेमींकडून करण्यात येत होती.

दरम्यान पर्यावरण प्रेमींच्या मागणीला यश आले असून पर्यावरण निधीतून आयुक्तांनी जाळी बसविण्यासाठी २५ लाख रुपये मंजूर केले. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या हस्ते २३ ऑक्टोबर २०२१ रोजी या कामाचा शुभारंभ झाला. या दोन्ही पुलांवर संरक्षक जाळी बसविण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. यामुळे येथून घाण, कचरा टाकण्याला प्रतिबंध बसला असून, नंदिनीचे प्रदूषण रोखण्याला मदत होणार आहे.