नाशिककरांना जोडणारा ‘रामसेतू’ तोडण्यात येणार; नागरिकांचा विरोध

नाशिक । प्रतिनिधी
गोदावरी नदीवरील पंचवटी व नाशिक शहराला जोडणारा ऐतिहासिक रामसेतू पूल आहे. हाच रामसेतू तोडण्याच्या हालचाली स्मार्ट सिटीचे अधिकारी करीत आहेत. दरम्यान या कामास रामसेतू बचाव अभियाना सह नाशिककरांनी यास विरोध केला आहे.

गोदावरी नदीवर असलेल्या या रामसेतू पुलाला ऐतिहासिक महत्व आहे. मात्र नाशिकमध्ये होत असलेल्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत हा पूल पाडण्यात येणार असून त्या जागी नवा पूल बांधण्यात येणार आहे. दरम्यान नारोशंकर मंदिराजवळील दोन सांडवे तोडण्यात आल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी रामसेतूची मदत घ्यावी लागत आहे. रामसेतू तोडला तर नाशिक व पंचवटीतील रहिवाशांना जाण्या-येण्यासाठी प्रचंड अडचणीचे ठरणार आहे.

याबाबत रामसेतू बचाव अभियानाच्या अध्यक्षा कल्पना पांडे यांनी विरोध केला आहे. त्या म्हणाल्या कि, रामसेतू हा पूल अतिशय जुना असून तो तोडता कामा नये. गोदावरील हा रामसेतू पूल न तोडता त्याची डागडुजी करून पूर्वरत करावा त्याला तोडण्याचा घाट घालू नये, अन्यथा रामसेतू बचाव अभियानाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच स्मार्ट सिटीने स्मार्ट वर्क जरूर करावं, मात्र नाशिकमधील पौराणिक वस्तुंना जतन करणे आवश्यक आहे. जुन्या ऐतिहासिक वस्तुंना स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी हात लावू नये, यासाठी नेहमी विरोध करत राहू..

तर दुसरीकडे स्मार्ट सिटी म्हणते कि, पूल ६० वर्षाहून अधिक जुना झाल्याने सध्या पूल धोकादायक परिस्थितीत आहे. त्यामुळे पूल पाडून नव्याने बांधणं आवश्यक आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी कामाच्या अंतर्गत पूल पाडून नव्याने बांधण्यात येणार आहे. मात्र रामसेतू पुलाला पाडण्यास नागरिकांचा विरोध असून यासाठी रामसेतू बचाव अभियानाअंतर्गत विनंती करण्यात आली आहे. पुलाला डागडुजी करण्यात यावी, ज्या ज्या ठिकाणी बांधकाम ढासळले असेल तेथे रिपेअर करावे, परंतु पुलाला पाडण्यात येऊ नये, असे सांगण्यात आले आहे.