Home » सुरगाणा नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची उद्या निवडणूक

सुरगाणा नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची उद्या निवडणूक

by नाशिक तक
0 comment

सुरगाणा । प्रतिनिधी

सहलीला गेलेल्या भाजपच्या नगरसेविका काशीबाई नागू पवार यांच्या निधनाने सुरगाणा तालुक्यात शोककळा पसरली आहे. मात्र त्यांच्या निधनाने सुरगाणा नगरपंचायतीत उद्या नगराध्यक्ष पदाची निवडणुक होत असल्याने समीकरणे बदलणार का? अशा प्रश्न उपस्थित होत आहे.

नुकत्याच पार पडलेल्या सुरगाणा नगरपंचायतीच्या निवडणूकीत येथील शामू पवार यांच्या मातोश्री ७० वर्षीय काशीबाई पवार ह्या भाजपकडून प्रभाग क्रमांक १७ मधून निवडून आल्या होत्या. त्यांची सून अमृता पवार ह्या देखील प्रभाग क्रमांक १३ मधून निवडून आल्या आहेत. नगरसेविका काशीबाई यांनी त्यांच्या प्रभागासह सर्वच प्रभागातून पक्षाच्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला होता.

दरम्यान १५ फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक असल्याने भाजपचे नगरसेवक व नगरसेविका सहलीवर गेले होते. काही नगरसेवक वापी येथे तर पवार परिवारातील सदस्य अजमेर येथे गेले होते. अजमेर येथे दर्शन घेऊन ते वापी येथे रात्री उशिरा पोहोचले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच (दि.१३) रोजी काशीबाई या सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास स्नानगृहात आंघोळीसाठी गेल्या असता त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले.

१५ फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष पदाची निवड होणार आहे. भाजप ८, शिवसेना ६, माकप २ व राष्ट्रवादी काँग्रेस १ याप्रमाणे नगरसेवक असून नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून विजय कानडे व शिवसेनेने कडून भारत वाघमारे यांनी नामांकन पत्र दाखल केले आहे. हे पद मिळविण्यासाठी दोन्ही कडून जोरदार प्रयत्न सुरू असताना प्रथमच निवडणूक लढवत विजय प्राप्त केलेल्या भाजपच्या नगरसेविका काशीबाई पवार यांचे निधन झाल्याची वार्ता आली आणि शहरात शोककळा पसरली.

दरम्यान आता उद्या (दि.१५) रोजी सुरगाणा नगरपंचायतीत नगराध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे. त्यामुळे आता काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!