सुकेणे परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

नाशिक । प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे परिसरात दहशत पसरविणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे. आज पहाटे हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.

गेल्या अनेक दिवसांपासून मौजे सुकेणे परिसरात या बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे परिसरात द्राक्ष बागायतदार तथा इतर शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली होती. त्यामुळे रात्री बेरात्री पाणी भरण्यास शेतकरी धजावत नव्हते. दरम्यान ग्रामस्थांच्या व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार येथील अभिजित सुकेणेकर यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला होता.

दरम्यान आज पहाटेच्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला आहे. हा बिबट्या नर जातीचा असून ६ ते सात वर्षाचा असल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांत बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय मेहेत्रे, मनमाडचे वनपाल भगवान जाधव, भैय्या शेख व वनमजूर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर बिबट्या जेरबंद असलेला पिंजरा ताब्यात घेतला.