नाशिक जिल्ह्यात भात लावणीला आला वेग

नाशिक: सुरगाणा (Surgana Taluka) परिसरात सुरूवातीला दडी दिलेल्या पावसाने चांगलाच तग धरून ठेवला त्यामुळे पेरणी केलेल्या भातपिकाला उत्तम रोपे आली आहेत. अशात काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे आता सुरगाणा तालुक्यात भात लागवडीला वेग आला आहे. पावसामुळे भात (Planting rice) लागवडीच्या कामांना वेगाने सुरुवात झाल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात आहे.

सुरुवातीला दडी मारलेल्या पावसाने दम’धार’ (Heavy Rain) पुनरागमनाने तालुक्यातील शेतकऱ्यांना खूश केले आहे. पावसाच्या सुरवातीला पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील भाताची रोपे जोम धरून लावणीसाठी तयार झाली असून लावणीच्या कामास मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. दमदार पावसामुळे परिसरातील शेती पाण्याने भरली असून भात लागवडीस आवश्यक वातावरण निर्मिती झाली आहे. त्यामुळे तालुक्यात विविध भागात लागवडीच्या कामांची लगबग दिसत आहे. या काळात शेतकरी पावसापासुन संरक्षण होण्यासाठी बांबूपासुन बनविलेले घोंगडे प्लास्टीकची, घोंगडी,कांबळ यांचा वापर तालुक्यातील शेतकरी करतांना दिसुन येत आहेत.

सुरगाणा तालुक्यात प्रामुख्याने कोळपी, इंद्रायणी सुप्रिया, ओम साई, प्रणाली वाडा, झिनीया वाडा, समृद्धी, गौरी, रूपाली, शतायुषी, ज्ञानेश्वरी, लक्ष्मी १७, दप्तरी, वाडा कोमल, यु एस ३१२, राशीपुनम, सुमा, सुंदर अशा विविध जातीच्या भातबियाणांची लागवड केली जाते. त्याचबरोबर भाताला जोड पिक म्हणून नागली,वरई याही पिकाची तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. दरम्यान या वर्षी सुरगाणा तालुक्यात पडणारा पाऊस हा शेतीसाठी उपयुक्त ठरत असून मध्येच पडणारे ऊन यामुळे भात शेतीसाठी अतिशय पोषक वातावरण निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून उमटत आहे.