घोटी येथे डॉक्टरच्या बायकोला चाकूचा धाक दाखवून धाडसी दरोडा

नाशिक । प्रतिनिधी
घोटी शहरातील डॉक्टरांच्या घरात दरोडा टाकून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने मिळून अंदाजे 3 लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटयांनी पोबारा केल्याची घटना घडली आहे.

घोटी शहरातील श्रीरामवाडी येथील रहीवासी संकुलात रात्री २ ते ३ वाजेदरम्यान हि घटना घडली. येथे राहणारे बालरोगतज्ञ डॉ सुनील बुळे यांच्या श्रीरामवाडी येथील घरात घुसत तलवारीचा धाक दाखवत या दरोडेखोरांनी चोरी केली.

घटनेच्या वेळी डॉ. बुळे स्वत:च्या हॉस्पिटलला इमर्जेंसी रुग्ण तपासण्यासाठी घराला बाहेरून कुलूप लावून गेले होते. यावेळी डॉ. सविता बुळे घरात एकट्याच होत्या. त्यामुळे चोरांनी संधीचा फायदा घेत घराच्या दरवाजाचा कोंडा तोडून आत प्रवेश केला व तलवारीचा धाक दाखवत दरोडा टाकून डॉ. सविता यांना कोणतीही इजा न करता मुद्देमाल घेऊन पसार झाले.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डॉ घोटी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असून पुढील तपास घोटी पोलिस करत आहेत.