नाशिक | प्रतिनिधी
नाशिकसह जिल्ह्यात सकाळपासून एकच चर्चा आहे ती, म्हणजे नंदी पाणी किंवा दूध पितो आहे? या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
दरम्यान आज दिवसभर जिल्ह्यात नंदीची मूर्ती पाणी पित असल्याची चर्चा सोशल मीडिया माध्यमातून पसरली आणि मग काय सर्वत्र मंदिरात गर्दी झाली. निफाड, सुरगाणा, नांदूरमध्यमेश्वर, येवला आदी ठिकाणी महिलावर्गासह नागरिकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान ह्या घटनेमागील शास्त्रीय कारण म्हणजे द्रवाचा पृष्ठीय तणाव किंवा इंग्रजीत ज्याला सरफेस टेन्शन म्हणतात तो आहे, अशा प्रकारच्या विज्ञानाच्या नियमांवर आधारित असलेली ही घटना आहे, त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष प्रा.दिगंबर कट्यारे यांनी याबाबत खुलासा केला की नंदी किंवा गणपती कधीच पाणी, दूध पित नसतो. वैज्ञानिकदृष्ट्या पाण्याच्या पृष्टीय ताणाच्या अप्रभावामुळे हा प्रकार घडत असतो.
तर कशामुळे?
सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून पाषाण अथवा धातूची मूर्ती शुष्क व कोरड्या झाल्याने त्यामधील केशाकर्षण वाढले आहे. त्यामुळे द्रवपदार्थ शोषले जात आहेत. सदर घटनेला कोणताही वैज्ञानिक आधार नसून अशा घटनांकडे भाविकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितले पाहिजे. अंधश्रद्धेला बळी न पडता अशा अफवांवर विश्वास ठेवू नये..