नाशिक । प्रतिनिधी
चांदवड येथे एका उथळ असलेल्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून यशस्वीरीत्या रेस्क्यू करण्यात यश आले आहे. विहिरीत पडलेला बिबट्या पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
नाशिकच्या चांदवड तालुक्यातील धर्मा भवर यांच्या विहिरीत भक्ष्याच्या शोधात असणारा बिबट्या पडला. बाहेर येण्याचा प्रयत्न करूनही त्याला येता येईना. पाण्यात पोहून तो दमला. हा बिबट्या पाच ते सहा वर्षे वयाचा होता. स्थानिक नागरिकांनी ताबडतोब वन विभागाला माहिती कळवली. तोपर्यंत नागरिकांनी बिबट्या न बुडावा यासाठी खाट टाकली. यानंतर बिबट्या त्या खाटेवर विहिरीत बसून होता.
त्यानंतर तातडीने वनविभागाची रेस्क्यू टीम तेथे दाखल झाली. रेस्क्यू टीमने पिंजरा थेट विहिरीत सोडला, त्याच वेळी पोहून दमछाक झाल्याने, खाटेवर बसलेल्या बिबट्याने पिंजऱ्याचे उघडे झाकण पाहून त्यात झेप घेतली. त्याच क्षणी पिंजऱ्याचे दार पाडून बिबट्याला जेरबंद करण्यात आले.
दरम्यान वनविभागाने स्थानिकांच्या मदतीने बिबट्याला पिंजऱ्याच्या साहाय्याने विहिरीतून सुखरूप बाहेर काढत असून बिबट्याचा जीव वाचविण्यात यश आले आहे.