नाशिक | प्रतिनिधी
लोकहितवादी मंडळ नाशिक अयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे पार पडत आहे.
या संमेलनाच्या पूर्व संध्येला माझे जिवीची आवडी या सांस्कृतिक कार्यक्रमातून संमेलनाला उत्स्फूर्त शुभारंभ झाला. यावेळी पावसाच्या सरीसोबत थंडगार वातावरणात काव्य,अभंग, गीत, संगीताने नाशिककर नागरिक मंत्रमुग्ध झाले.
माझ्या जिवीची आवडी कार्यक्रमाच्या माध्यमातून कवी संदीप खरे, संगीतकार सलील कुलकर्णी, गायक हृषीकेश देशपांडे, विभावरी आपटे जोशी, शरयू दाते, शुभंकर कुलकर्णी, चिन्मयी सुमित, विभावरी देशपांडे यांनी संत रचनांपासून स्वातंत्रवीर सावरकर, भा.रा.तांबे, कुसुमाग्रज, बोरकर, आरती प्रभू, ग्रेस, शंकर वैद्य, विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर, शांताबाई शेळके, बहिणाबाई,केशव सूत, वसंत बापट, माधव ज्युलियन, बा.सी. मर्ढेकर, नामदेव ढसाळ, ना.धो.महानोर, प्रा.कवी ग्रेस, आरती प्रभू असा एक काव्य-गीत-गझल-संगीतमय देखणा प्रवास आपल्या सादरीकरणातून नाशिककरांसमोर उभा केला.
यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, संमेलन समन्वयक समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, विश्वास ठाकूर, प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, मिलिंद कुलकर्णी, सुभाष पाटील, प्राचार्य प्रशांत पाटील, रंजन ठाकरे, दिलीप खैरे,दिलीप साळवेकर, चंद्रकांत दिक्षित, भगवान हिरे, किरण समेळ, सुनील भुरे, डॉ. वाघ, डॉ.शेफाली भुजबळ, दुर्गा वाघ यांच्यासह नाशिककर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.