जिल्ह्यातील २३ अनाथ बालकांना प्रत्येकी ५ लाख सानुग्रह अनुदान

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यातील कोविड-19 या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना 36 कोटी 42 लाखांचे सानुग्रह अनुदान मंजुर करण्यात आले असून कोविड-19 च्या काळात 0 ते 18 वयोगटातील दोन्ही पालक गमावलेल्या 23 बालकांना प्रत्येकी 5 लाख सानुग्रह अनुदान मुदत ठेवीच्या स्वरूपात देण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

आज जिल्हाभरात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. नाशिकमध्ये पोलीस परेड मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भुजबळ बोलत होते. ते यावेळी म्हणाले की, जिल्ह्यातील कोविड-19 या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना 36 कोटी 42 लाखांचे सानुग्रह अनुदान मंजुर करण्यात आले.

तसेच या बालकांना ‘बाल संगोपन योजनेंतर्गत प्रति महिना 1100 रुपये एवढा लाभ देण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. या बालकांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून आत्तापर्यंत 3 लाख 13 हजार 59 रूपये फी संबंधीत शाळांना अदा करण्यात आली आहे.

तसेच कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात तिसऱ्या लाटेच्या वेळी मालेगावकरांनी आपल्या प्रतिकार शक्तिच्या जोरावर कोरोनाला रोखून धरले आहे. याबाबतची शास्त्रीय कारणमीमांसा शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ संशोधनाचे काम करीत आहेत, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नमूद केले.