नाशिक । प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यात सोनाशी येथे राघोजी भांगरे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार असून त्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
जिल्हाभरात आज मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी भुजबळांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या राघोजी भांगरे व आद्य क्रांतीकारक बिरसा मुंडा यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांचे कार्य आणि देशासाठी दिलेले बलिदान लक्षात घेऊन इगतपुरी तालुक्यात सोनाशी येथे राघोजी भांगरे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे.
आदिवासी हा देशाचा मूळ निवासी असून त्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही. त्यांना त्यांचे हक्क देण्याची त्याचा सन्मान देण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे. या जबाबदारीतूनच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून बिरसा मुंडा यांच्या स्मृतींसोबत क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या राष्ट्रीय क्रांती स्मारकाच्या माध्यमातून आदिवासी क्रांतिकारकांचा सन्मान या निमित्ताने करण्यात येत आहे.
लाखो लोकांच्या बलिदानानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे, त्यात क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचेही योगदान अविस्मरणीय व अतुलनीय असे आहे. क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाच्या रुपाने स्वातंत्र्याची ज्योत तेवत राहील. त्यामुळे आदिवासी क्रांतिकारकांना समजून घेतले पाहिजे. त्यांचे आदिवासी समाजासाठीचे योगदान मौल्यवान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.