त्र्यंबकेश्वर । प्रतिनिधी
त्र्यंबक शहरातील शहरातील पाटील गल्ली येथील सेंट्रल बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्याने तोडल्याची घटना घडली आहे. मात्र पैसे चोरण्यात हा चोरटा अयशस्वी झाल्याचे निदर्शनास आले आहे.
दरम्यान मंगळवारी (दि. २५) रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून चोरटा फरार झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, येथील सेंट्रल बँकेचे एटीएम फोडले असल्याचा फोन सेंट्रल बँकेच्या हैद्राबाद या शाखेने त्र्यंबकेश्वर पोलिसांना केला. त्र्यंबक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
यावेळी त्र्यंबक पोलिसांना एटीएम फोडल्याचे निदर्शनास आले. त्र्यंबक पोलिसांनी परिसरातील सी.सी.टीव्हीची तपासणी करत चोरट्याचा तपास केला. मात्र चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला मात्र पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या. एटीएमचे सायरन न वाजणे, सिक्युरिटी गार्ड नसणे अशी बेफिकिरी असल्याने एटीएम फोडण्याचा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत सेंट्रल बँकेकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
एकीकडे शहरभर जोरदार थंडी असतांना नागरिक घराबाहेर पाडण्याचे टाळत आहेत. याचाच फायदा घेत चोरट्याने एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी झाला आहे. या प्रकरणी पो कर्मचारी श्रावण साळवे, समाधान केदारे यांनी अधिक तपास सुरू ठेवला आहे.