नाशिक । प्रतिनिधी
‘‘आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली, पण काही आम्हांल पाणी मिळला नाय, गावातलं डवरं मरुन गेलं पण दुष्काळ आमचे पाचवील पुजलाय, त्यो काय पाठ सोडायला तयार न्हाई, आम्हांक कोणीच लक्ष देईना झालाय… ! हे बोल त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी येथील गावकऱ्यांचे!
१९७२ चा दुष्काळ आठवला तरी अंगावर काटे येतात. आणि त्याच वर्षी दुगारवाडी या छोट्याश्या वाडीची स्थापना झाली.. दूगारवाडी अवघी दोनशे तीनशे लोकांची वस्ती. मात्र अद्यापही पायाभूत सुविधांसह पाणी ही समस्या येथील गावकऱ्यांना भेडसावत आहे. मात्र यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली असतांना अद्यापही दूगारवाडीकरांच्या नशिबी पाण्याचा संघर्ष सुरूच आहे.
येथील पांडुरंग भुरंगे सांगतात, १९७२ च्या दुष्काळापासून आमची अशीच अवस्थाय, तव्हा उपासमारीत दुष्काळ गेला. आता शेतात धान्य पिकलं न्हाय, पर ते इकडून-तिकडून मिळतंय. त्याची टंचाई न्हाय जाणवत. टंचाई हाय ती पाण्याची अन् त्यामुळं जीव कासावीस व्हाया लागलाय.’’ तर येथील ९० वर्षाच्या आजीबाई सांगतात, की आमची हयात गेली, पण पाणी काय मिळणा..! माल चालवत नाय, पण लहान नात दोन कोस चालून पाणी आणतेय, तवा आमच्यासारख्यानी काय करायचा…पाणी वाहता वाहता मरायचा काय, अशा उद्विग्न स्वरूपात त्यांनी आपली व्यस्था मांडली..
दूगारवाडी पासून दोन किमीवर एक झिरा आहे, झिरा कसला पाण्याचं डबकचं ते! अत्यंत गढूळ अवस्थेतून येथील बाया माणसं पाणी आणतात. सुकलाल भुरंगे सांगतात, ‘दिसभर झिऱ्या ला पाणी नसतय, मग आम्ही रातीचे जाऊन पाणी भरतुय, मग आम्हालय, बायामाणसा बरुबर जावा लागतंय, तवा पियाल, पाणी भेटतंय, आमचं डवर मरून गेलं, पण काही मिळला न्हाय..!
एकीकडे त्र्यंबकेश्वर तालुका सर्वाधिक पाऊस पडणारा तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र इथल्या खेड्यापाड्यात अद्याप पाणीच पोहचले नसल्याचे विदारक चित्र पाहायला मिळते. दुगारवाडीच्या ग्रामस्थांना जानेवारीतच दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतात. महत्त्वाचे म्हणजे नाशिक जिल्ह्यातच नवे महाराष्ट्रात येथील दूगारवाडी धबधबा प्रसिद्ध आहे. मात्र प्रसिद्ध मिळालेल्या दूगारवाडीला पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याचे दिसून येते.
एकूणच ‘पाण्यासाठी दाहीदिशा, आम्हा फिरविशी जगदिशा अशी वेळ येथील गावकऱ्यांवर आली आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही येथील पाणी प्रश्न जैसे थे आहे. निवडणुकांच्या वेळी अनेक पुढारी घराघरात पाणी देण्याचे स्वप्नं दाखवून पसार होतात. मात्र नुसत्या घोषणांनी दुष्काळ हटत नसतो, असे येथील गावकरी सांगतात. मते मागायला आलेल्या पुढाऱ्यांच्या मनाला उन्हा-तान्हात पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या माय माउल्यांना पाहून पाझर का फुटत नाही? असा प्रश्न या विदारक परिस्थितीवरून उपस्थित होतो..