सुरगाण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

नाशिक | प्रतिनिधी
जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, तसेच अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन व्हावे यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचे आदेशान्वये पोलीस ठाणे निहाय कारवाई सुरू आहे. त्या अनुषंगाने बोरगाव ते सुरगाणा रस्त्यावर पोलीस पथकांनी बुधवार (दि. २६) रोजी नागशिवडी गावाच्या परिसरात छापा टाकुन अवैधरित्या घातक अग्निशस्त्र बाळगणारे इसमांना ताब्यात घेतले.

दरम्यान या कारवाईत अंकेश सुरेश एखंडे (२९, गोदंब, सुरगाणा), श्यामराव नामदेव पवार (२४, वांजूरवाडा, सुरगाणा), आकाश सुनील भगरे (२२, सुरगाणा) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. या संशयितांकडून ०३ देशी बनावटीचे पिस्तुल (गावठी कट्टे) व ०३ जिवंत काडतुसे, ०१ एअर गन, ०१ चॉपर, ०१ कोयता अशा घातक अग्निशस्त्र हस्तगत करण्यात आले. याचबरोबर ०६ मोबाईलसह टोयटो वाहन ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणी सुरगाणा पोलीस स्टेशनमध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस पथक पुढील तपास करीत आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलीस पथकातील पोनि हेमंत पाटील, सपोनि रामेश्वर मोताळे, सहा पोउपनी नाना शिरोळे, पोहवा गोरक्षनाथ सवंतस्कर, पोहवा किशोर खराटे, पोहवा प्रवीण सानप, पोना विश्वनाथ काकड यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.