‘या’ भाविकांनाच मिळणार सप्तश्रुंगी देवीचं दर्शन, वाचा नवी नियमावली

नाशिक । प्रतिनिधी

ओमायक्रोन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या वणीच्या सप्तशृंगीगडावर एक डोस घेतला असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही, असे आवाहन सप्तशृंगी देवी ट्रस्टने केले आहे.

साडेतीन शक्तीपीठ पैकी आद्यपीठ म्हणून सप्तशृंगी मंदिराची ओळख आहे. या ठिकाणी राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक रोज दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे दिवसभर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर मंदिर २४ खुले ठेवले आहे. तसेच भाविकांना पास शिवाय मंदिरात प्रवेश दिला जात नाही. मात्र आता लसीचा एक डोस घेतलेल्यानांच प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.

तसेच ६५ वर्षावरील व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि लहान मुलांना या काळात गडावर येऊ नये, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पास मिळवण्यासाठी कोरोना लसीचे एक डोस घेतल्याचा पुरावा असणे बंधनकारक करण्यात आले आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भाव च्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून पर्याय म्हणून ई पास आणि ऑनलाइन दर्शनाचा लाभ भाविकांसाठी करून देण्यात आला आहे.

तर मंदिर प्रशासनाच्या वतीने www.ssndtonline.org या संकेस्थळावर ई दर्शन पास उपलब्ध करून दिले आहे. भाविकांनी ई-दर्शन / ऑनलाईन दर्शन पासच्या माध्यमातून दर्शन सुविधा उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे.

अशी आहे नियमावली

किमान १ किंवा २ डोस पूर्ण केलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश

१० वर्षापेक्षा कमी तसेच वय वर्ष ६५ पेक्षा अधिक वयाच्या भाविक तसेच ग्रामस्थांना प्रवेश नाही.

कोरोना त्रिसूत्रीचे पालन बंधनकारक : मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे.