मंत्री भारती पवार यांच्या हस्ते मुलांच्या लसीकरणाला सुरुवात

नाशिक । प्रतिनिधी
नाशिक बिटको रुग्णालयात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी आजपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली.

केंद्र सरकारने किशोरवयीन मुलांमध्ये कोरोनाचा धोका टाळण्यासाठी लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असून, या मुलांना कोव्हॅक्सिन डोस दिला जाणार आहे. दरम्यान मोहिमेला नाशिक जिल्ह्यात सुरवात झाली असून त्यासाठी ग्रामीण भागातील रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये अशा ४६ ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहे. तर मालेगाव व नाशिक महापालिका हद्दीत प्रत्येकी सहा केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्रावर शंभर लसीकरणाचे उद्दिष्ट असल्यामुळे ५८०० डोस दरदिवसा देण्याचे ठरविण्यात आले आहे.

दरम्यान या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज बिटको रुग्णालयात भेट देत मोहिमेला हिरवा कंदील दिला. यावेळी त्या म्हणाल्या कि, देशात पुन्हा काही राज्यात कोरोना रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्यसरकारने यावर तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर टाळेबंदी संदर्भात राज्याने निर्णय घ्यायचा असून या संदर्भात आम्ही राज्यांना सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

किशोरवयीन मुलांच्या लसीकरण मोहिमेत जिल्ह्यामध्ये साडेतीन लाख मुलांना कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्प्यात ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णांलयांमध्ये ही लस देण्यात येणार आहे. या केंद्रांवर प्रतिसाद वाढल्यानंतर इतर ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा मार्च महिन्यात आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा यंदा ऑफलाईन होण्याची शक्यता आहे. सरकारने तशी तयारी केली आहे. त्यामुळे पहिल्यांदा या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.