नाशिकच्या बाजारपेठांमधील गर्दी देतेय कोरोनाला निमंत्रण

नाशिक । प्रतिनिधी

एकीकडे नाशिक शहरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून दुसरीकडे शहरातील महत्वाच्या बाजारपेठेत गर्दीही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे कोरोना चा आलेख वाढत आहे.

गेल्या काही दिवसापासून नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट झाल्याने रात्रीची जमावबंदी केली मात्र नाशिकमधील बाजारपेठा आजही ओसंडून वाहत आहेत, त्यांना कोण रोखणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आलेख वाढत असून दिवसागणिक १०० हुन अधिक रुग्णांची भर पडते आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

नाशिकच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या शालिमार, मेनरोड, गंगापुररोड आदी भागात नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे एकप्रकारे हि गर्दी कोरोनाला निमंत्रण देत असल्याचे दिसून येत आहे. या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोनाच्या सर्व नियमांची पायमल्ली होते आहे. व्यापारी, दुकानदार, ग्राहक हे सर्वच कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत आहेत.

त्यामुळे मनपा प्रशासनाने बाजारपेठेकडे लक्ष देण्याची गरज असून अन्यथा कोरोना रुग्ण संख्या वाढण्यास वेळ लागणार नाही. कारण गेल्या काही दिवसांत नाशिकमधील आकडा वाढला आहे. वाढत्या रुग्ण संख्यमुळे आरोग्य विभाग पुन्हा हायलर्टवर आला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.