कोटंबी घाटात अपघाताची मालिका सुरूच

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्र – गुजरात राज्याला जोडणाऱ्या पेठ-नाशिक महामार्गावरील कोटंबी घाटात अपघाताची मालिका सुरूच आहे. घाटात रस्त्याचे काम अरूंद असल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. आज सकाळच्या सुमारास ट्रक आणि मोटारसायकल अपघातात तिघेजण जखमी झाले असून एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

पेठ- नाशिक मार्गावरील कोटंबी हा महत्वाचा घाट आहे. याच मार्गाने गुजरातकडे जाता येते. मात्र सध्या हा घाट अपघाताला आमंत्रण देणारा ठरत आहे. या मार्गावरून अवजड वाहनाची वाहतूक होते. त्यामुळे अनेकदा ट्रक कोसळून अपघात झाल्याच्या घटना घडत आहेत. तर काही ठिकाणी अवघड वळणे असल्याने दुचाकी धारकांचे अपघात झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.

आज सकाळी नाशिकहून पेठ जात असताना एका दुचाकीला ट्रकचा धक्का लागल्याने मोठा अपघात झाला. यावेळी दुचाकीवरील तिघेजण रस्त्यावर फेकले गेले. यातील दोघांना किरकोळ दुखापत झाली तर एकाला आपला पाय गमवावा लागला असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. तर रस्त्यावरून जाणाऱ्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली.

या घाटात वारंवार अपघात होत असताना ही प्रशासन व लोकप्रतिनिधीचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. घाटातील अरुंद रस्ता आणखी किती बळी घेणार आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. ठोस उपाययोजने अभावी अपघात वाढल्याने वाहन धारकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.