प्राणायाम करताना घडलं भलतंच, महिलेचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरात व्यायाम करत असतांना ३० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोनल आव्हाड (३०) असे या महिलेचे नाव आहे.

मखमलाबाद परिसरात राहणाऱ्या सोनल या नेहमीच प्राणायाम करीत असत. आज सकाळी त्या नेहमीप्रमाणे प्राणायाम करत होत्या. यावेळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. काही वेळांनंतर जमिनीवर कोसळल्या. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

सोनल यांना आधीच हृदयविकाराचा त्रास असावा किंवा आज अचानक वाढलेल्या थंडीमुळे त्यांना अधिक त्रास झाला असावा असा अंदाज वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान या घटनेमुळे व्यायाम प्रेमी आणि जिम प्रेमींमध्ये धडकी भरली आहे. उत्तम शरीरयष्टी, संतुलित शरीर मिळवण्यासाठी हल्ली प्रत्येकाचा ओढा जिम, योगा यांकडे वाढला आहे. मात्र झटपटरित्या फिटनेस मिळवण्याचा प्रयत्न जीवावरही बेतू शकतो. ही घटना याबाबत सगळ्यांनाच सावध करणारी आहे.