धक्कादायक..! मंत्री उदय सामंत यांना जाळून मारण्याची धमकी

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या नाणार रिफायनरी प्रकल्पावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकल्पाविरोधात याआधीही ग्रामस्थांनी आंदोलन पुकारलं होतं. मात्र हा वाद आता राजकीय नेत्यांपर्यंत गेला आहे. या रिफायनरीच्या प्रकल्पा विरोधात असलेल्या आंदोलकांनी थेट उद्योग मंत्री उदय सामंत यांना धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पोलीस त्या ठिकाणी उपस्थित असताना ही धमकी देण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काल राजापूर दौऱ्यावर होते. यावेळी ही धमकी देण्यात आली. रिफायनर विरोधक जोशी नावाच्या एका नेत्याने नाना पटोले व पोलिसांच्या उपस्थितीत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून ठार मारण्याची धमकी दिली आहे. “रिफायनरी प्रकल्प झाला तर उदय सामंत यांना जाळून टाकू”, असं ते म्हणाले.

जोशी नामक नेत्याचा हा व्हिडओ आता सोशल मिडीयावर व्हायरल होत असून पोलिसांनी आता या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. आता या प्रकरणात कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी देखील लक्ष घातले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी आमदार सामंत यांच्यासोबत चर्चा केली असून आता याबाबत अधिक चौकशी केली जात आहे.

नरेंद्र जोशी भलतेच आक्रमक

आम्ही मुंबईत असलो तरी आमच्यावर गुन्हे दाखल केले जातात. कुठल्या आधारे टाकले जातात? कोणीतरी मंत्री सांगतो म्हणून आम्हाला त्रास दिला जातो. हे आम्ही खपवून घेणार नाही. रिफायनरी प्रकल्प झाला तर उदय सामंत यांना जाळून टाकू. आमचा गाव आणि आमची पंचक्रोशी आम्ही सोडणार नाही. – नरेंद्र जोशी.

मिळालेल्या धमकीवर उदय सामंत यांची प्रतिक्रिया

विरोध असू शकतो. विरोध हा लोकशाहीचा एक भाग आहे. मात्र मंत्र्याने जर पाऊल टाकलं तर तंगड्या मोडू, त्याला मारून टाकू, त्याला ठार मारू ही जी काही भाषा आहे, ती फार वाईट आहे. या संबंधी माझी पोलिसांशी चर्चा झाली आहे. संबंधित व्यक्तीचा धमकी देण्यामागे काय हेतू होता. त्याची सविस्तर तपासणी पोलीस करतील. विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यावेळी व्यासपीठावर असतील आणि त्यांच्यासमोर असं वक्तव्य कोणी करीत असेल तर त्यांनी तिथे थांबायला पाहिजे होतं. पोलीस देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. एखादी गुंड प्रवृत्तीची व्यक्ती पोलिसांसमोर कोणाच्या तंगड्या मोडण्याची किंवा जाळून टाकण्याची धमकी देत असेल आणि पोलीस त्यावर कारवाई करत नसतील तर ही दखल घेण्यासारखी बाब आहे. याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे. – उदय सामंत, उद्योग मंत्री.