विद्रोही साहित्य संमेलन अवघ्या पावणे सहा लाखांत!

नाशिक । प्रतिनिधी

मविप्रच्या अभिनव शाळेच्या मैदानावर डिसेंबर २०२१ मध्ये पार पडलेल्या संविधान सन्मानार्थ १५वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा जमाखर्च जाहीर करण्यात आला. या दोन दिवशीय संमेलन अवघ्या पाच लाख ६३ हजार ९३७ रुपयांत आटोपल्याचे आयोजकांनी जाहीर केले. या संमेलनाचा जमाखर्च लेखापरीक्षक संदीप नगरकर यांच्याकडून तपासून घेण्यात येऊन धर्मादाय आयुक्तांना सादर करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

४ व ५ डिसेंबरला पार पडलेल्या विद्रोही संमेलनामध्ये दोन हजार पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी झाले होते. दरम्यान या संमेलनाचा जमाखर्च जाहीर करण्यात आयोजकांकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी दोन दिवशीय संमेलनात झालेल्या खर्चाचा लेखाजोखा मांडला.

विद्रोही साहित्य संमेलनात मूठभर धान्य आणि एक रुपया या अभियानात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. जवळपास या अभियानातून ७६ हजार रुपये जमा झाल्याचे आयोजकांनी सांगितले. त्यामुळेच सहा लाखांपेक्षा कमी खर्चात अत्यंत दर्जेदार संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. दरम्यान मविप्र संस्थेने मोफत जागा उपलब्धीसह पाहुण्यांसाठी निवासाची व्यवस्था करून दिली. यावेळी आयोजक राजू देसले यांनी सर्व हातभार लावणाऱ्यांचे आभार मानले.

नाशिक मध्ये याच कालावधीत पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या खर्चाची आता उत्सुकता लागली आहे. मात्र मराठी साहित्य महामंडळाच्या नियमानुसार खर्चाची आकडेवारी साहित्य संमेलनानंतर तीन महिन्यांनी प्रसिद्ध केली जाते. त्यामुळे या मराठी साहित्य संमेलनाचा खर्च सादर करण्याची उत्सुकता लागली आहे.

असा झाला खर्च

मंडप ०२ लाख रुपये, जेवण एक लाख ८३ हजार ३७४ रुपये, बँनर आणि फ्लेक्स तीस हजार सहाशे रुपये, बँक चार्जेस १३७ रुपये, फोटोग्राफी १७ हजार रुपये, प्रिंटिंग २४ हजार चारशे, स्टिकर मोमेंटो २० हजार १०० रुपये, साऊंड सिस्टिम २७ हजार, वाहतूक खर्च ७२ हजार ६७१, इतर खर्च ०४ हजार ४८४, पत्रकार परिषद १८००, स्टेशनरी ११३२, झेरॉक्स, डीटीपी, फोटो फ्रेंम १२३८.