आईसह तीन मुलींवर भोंदूबाबाकडून अत्याचार

नाशिक । प्रतिनिधी

लग्न जमत नसल्याने भोंदू बाबाच्या आश्रयाला गेलेल्या महिलेसह तिच्या मुलींवर बाबाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येवला तालुक्यातील हि धक्कादायक घटना असून पोलिसांनी या भोंदूबाबाला अटक केली आहे.

मुलीला जादूटोणा झाल्याचे सांगत सलग दोन वर्षे भोंदूबाबा व त्याच्या भावाने आईसह तिच्या मुलींवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या मुलीचे लग्न जमत नसल्याने आई येवला तालुक्यातील नागडे गावातील एका बाबाकडे गेली असता बाबाने मुलीला जादूटोणा झाला आहे असे सांगितले. अडचण दूर करण्याच्या नावाखाली महिलेवर अत्याचार करण्यात आला. त्याच बरोबर तिच्या तीन मुलींवरही अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

भोंदूबाबाने आईसह तिन्ही मुलींना चाकूचा धाक दाखवत फिर्यादी मुलीवर अत्याचार करून त्याचा व्हिडीओ काढून आई व इतर दोन मुलींवर भोंदूबाबा व त्याचा सहकारी वकील या दोघांनी तब्बल दोन वर्षे चार महिने वेळोवेळी अत्याचार केला. तसेच, ब्लॅकमेल करत आतापर्यंत आठ लाख रुपये उकळले आहेत. या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी भोंदू बाबाला बेड्या ठोकल्या आहेत.