नाशिक । प्रतिनिधी
आझाद मैदानावर खा. संभाजी राजें छत्रपतीं सोबत नाशिक जिल्ह्यातील हजारो कुटुंब उपोषणाला बसणार असल्याची घोषणा सकल नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने नाशिक मध्ये आज केली. २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या छत्रपतींच्या आमरण उपोषणाला सक्रिय पाठिंबा देऊन त्याचे नियोजन करण्यासाठी आज वरदलक्ष्मी लाँसवर जिल्हा मराठा क्रांती मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो प्रमुख समन्वयक उपस्थित होते.
मराठा आरक्षणाचा मुद्दा न्याय प्रविष्ठ झाल्यानंतर मराठा समाजाला न्याय मिळण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन खा. संभाजी राजें छत्रपती यांनी राज्य आणि केंद्र सरकारला मराठा समाजाचे उभय सरकारांच्या हातात असलेले मुद्दे सोडवून दिलासा देण्याचा प्रस्ताव दिला होता. केवळ प्रस्ताव देऊन छत्रपती शांत बसले नाहीत तर निवडक पाच सहा मुद्दे काढून त्याची अंमलबजावणी सरकारने केली तरी मराठा समाजाचे बहुतांश प्रश्न मार्गी लागू शकतात. अशी यामागची राजेंची प्रामाणिक भूमिका होती आणि आहे.
राज्य सरकार केराच्या टोपलीत टाकीत असल्याने राजेंनी टोकाची भूमिका घेत येत्या 26 फेब्रुवारीला आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आमरण उपोषण करण्याचा निर्णय जाहीर करताना अनेक आंदोलनात भाजलेल्या मराठा समाजाला आणखी वेठीस धरायचे नाही, या प्रामाणिक भूमिकेतून ते एकटेच आमरण उपोषण करणार अशी भूमिका त्यांनी जाहीर केली, असली तरी सकल मराठा समाज या आंदोलनात सह कुटुंब सहभागी होऊन राज्य सरकारला धडा शिकविणार असल्याचा निर्धार सकल नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने आजच्या बैठकीत केला आहे.
नाशिक जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव कुटुंब कबील्यांसह आझाद मैदानावर उपस्थित राहून राजें सोबत उपस्थित राहून आंदोलनात सहभागी होणार आहे. आझाद मैदान वर जाण्यासाठी गाड्यांचे नियोजन करण्यासाठी तीन समाजबांधवांची कमिटी स्थापन केली आहे. त्यामध्ये अमित नडगे 8888810798 सागर पवार 899981579 अमोल जगळे 7350006844 यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान सकल मराठा क्रांती मोर्चा नाशिक च्या वतीने करण्यात आलेले आहे.