नाशिक । प्रतिनिधी
उंटवाडी येथील पर्यावरण प्रेमी चंद्रकिशोर पाटील दरवर्षी गजानन महाराज प्रकटदिन साजरा करताना पर्यावरण पूरक संदेश देणारे देखावे साजरे करतात. या वर्षी सुद्धा गजानन महाराजांच्या १४४ व्या प्रकटदिनानिमित्त त्यांनी आणि २०४० मधील स्वप्नातील नाशिकचा देखावा साकारला आहे. यासाठी त्यांनी आपल्याच सोसायटीतील चिमुकल्यांची मदत घेतली.
देखावा बनवताना २०२२ चे आजचे नाशिक आणि २०४० चे स्वप्नातील नाशिक असे दोन्ही देखावे दाखवून ‘विनाशाकडे नेणारा विकास’ आणि ‘शाश्वत विकास यांच्यातील फरक दाखवून दिला आहे.’ विनाशाकडे जाणाऱ्या विकासात झाडे तोडून रस्ते वाढवले आहेत. मोठ्या प्रमाणात विदेशी झाडे लावली आहेत. इमारतीबाहेर कचरा वर्गीकरण १०० टक्के होत नाही. रस्त्यावर गाड्यांची तोबा गर्दी आहे त्यामुळे पायी चालणारे आणि सायकलवरील नागरिकांना त्रास होत आहे. प्रदूषण वाढल्याने शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स २०० च्या पार पोहोचत आहे. शहराचे तापमान वाढले आहे.
याउलट २०४० मधील पर्यावरणप्रेमींच्या स्वप्नातील नाशिक साकारताना झिरो कार्बन एमिशन उद्दिष्ट ठेवून सुविधा वाढवल्या आहेत. शहरातील रस्ते फक्त चारचाकी वाहनांकरता न बनवता, सायकलिस्ट, पायी चालणारे नागरिक, छोटे प्राणी यांचाही विचार केला आहे. प्रत्येक इमारती बाहेर, शाळेबाहेर, मॉल बाहेर ओला कचरा आणि सुका कचरा वर्गीकरण होत आहे. रस्त्यातील झाडे न तोडता रस्ता झाडांच्या बाजूने नेला आहे.
रस्त्यावर गाड्या कमी आणि सायकल आणि पायी चालणारे जास्त आहेत. शहरातील मोठ्या झाडांची काळजी शहरातील पर्यावरणप्रेमी मिळून घेतात, ती झाडे त्यांनी दत्तक घेतली आहेत. या स्वप्नातील नाशिकचा एअर क्वालिटी इंडेक्स ४० च्या वर जात नाही आणि इथले तापमानही आटोक्यात आहे.
या देखाव्याविषयी बोलताना चंद्रकिशोर पाटील म्हणाले – ‘नाशिक शहरात अनेक धार्मिक, सामाजिक, राष्ट्रीय सण साजरे होतात. यासाठी लाखो रुपयांचा चुराडा चौकाचौकांत होतो. अशा सर्व सणांना पर्यावरण पूर्ण देखावे साजरे करायला हवेत. आणि ते करताना आपल्या भागातील लहान मुलांना या कमी सहभागी करून घेतले पाहिजे. जेणेकरून येणाऱ्या पिढीत पर्यावरणाबद्दल जागृती होईल आणि शाश्वत विकासाला चालना मिळेल’.
हा देखावा अक्षता चिचे, रोशन माळी, वैदेही पटेल, तेजस माळी, दुर्वेश दंडवते, सोहम चिचे,वेदांत उपासनी,लावण्या उपासनी या मुलांनी मिळून साकारला. याकामी त्यांना पर्यावरण प्रेमी चंद्रकिशोर पाटील, झटका संस्थेचे रोशन केदार, अभिव्यक्ती संस्थेच्या मयुरी धुमाळ, वनिता पाटील, नीलिमा चिचे यांनी मार्गदर्शन केले.