नांदूरमध्यमेश्वरमध्ये भरणार ‘बर्ड फेस्टिवल’

नाशिक | प्रतिनिधी
जिल्ह्यातील नांदूरमध्यमेश्वर येथे येत्या ५ व ६ मार्च रोजी पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटन संचालनालय व नाशिक वनविभागाकडून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.

दोन दिवस चालणाऱ्या या पक्षी महोत्सवामध्ये सायक्लोथानचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच नांदूरमध्यमेश्वर टूर व पक्षी निरीक्षण करण्यात येईल. यानंतर ज्येष्ठ पक्षी निरीक्षक दत्ता उगावकर यांचा सत्कारदेखील होणार आहे.

विविध विषयांवर या महोत्सव काळात चर्चासत्र होणार आहेत. यासोबतच वन्यजीव पर्यटन फोटोग्राफी तसेच जबाबदारीने केलेल्या छायाचित्रणाचा यात समावेश आहे. तसेच स्थानिक शेतकरी व आदिवासी यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन या महोत्सवात लावण्यात येणार असून याठिकाणी वस्तूंची विक्रीदेखील होणार आहे. तसेच पोवाडा गायन, पथनाट्य व आदिवासी कलावंतांचे लोकनृत्य यात सोंगी नृत्य वैगरे पारंपारिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती पर्यटन उपसंचालक मधुमती सरदेसाई राठोड यांनी दिली.

हा संपूर्ण पक्षी महोत्सव जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली व स्थानिक लोकप्रतिनिधीच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. महोत्सवातील सायक्लोथान व फोटोग्राफी स्पर्धेच्या नोंदणीसाठी www.thegreenmind.in या संकेतस्थळाला भेट द्या. तसेच महोत्सवाच्या अधिक माहितीसाठी पर्यटन संचलनालयास संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त पक्षीप्रेमींनी या महोत्सवास हजेरी लावावी असे आवाहन करण्यात आले आहे.