नवाब मलिक यांना अटक, आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीची कारवाई!

नाशिक । प्रतिनिधी

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडीद्वारे (ED) अटक करण्यात आली आहे. तब्बल आठ तासांपेक्षा अधीक काळ चौकशी केल्यानंतर ईडीने नवाब मलिक यांना अटक (ED Arrests Nawab Malik) केल्याची माहिती आहे.

आज (दि.२३) पहाटे पाच वाजता नवाब मलिक यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले होते. त्यानंतर सकाळी सात वाजता ईडी अधिकाऱ्यांसोबत नवाब मलिक ईडी कार्यालयात दाखल झाले होते. सकाळी पावणे आठच्या सुमारास नवाब मलिक यांची चौकशी सुरु झाली. दरम्यान ईडीने अटक केल्यानंतर नवाब मलिक यांना जेजे रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. जेजे रुग्णालयात नवाब मलिक यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील गुन्हेगारांकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर करण्यात येत आहे. याच प्रकरणात नवाब मलिक यांना अटक झाली आहे.

ईडीच्या बॅलर्ड पिअर येथील कार्यालयात नवाब मलिक यांची चौकशी सुरु होती. ईडी कार्यालयापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय आहे. त्यामुळे ईडी कार्यालयाजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवाब मलिक हे कॅबिनेट मंत्री असल्याने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते असल्याने कार्यकर्त्यांच्या भावना उत्साहीत होऊन काही अनुचीत प्रकार घडू नये.

दरम्यान ईडी कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दंगलनियंत्रक पथकही या ठिकाणी तैनात आहे. दुपारनंतर ईडी कार्यालयाबाहेर बंदोबस्तही वाढवण्यात आला. ईडीच्या कार्यालयाकडे जाणारे सर्व रस्तेही बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसराला पोलीस छावणीचे रूप प्राप्त झाले आहे.