नाशिक । प्रतिनिधी
गोपनीय माहितीच्या आधारे शहापूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी इगतपुरी परिसरात बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाई दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपींकडून बिबट्याची कातडीसह चार दुचाकी जप्त केल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शहापूर परिसरातील वनपरीक्षेत्र वाशाळा गावानजीक बिबट्याची कातडीचा व्यवहार होत असल्याची गुप्त बातमी वनविभागाला मिळाली. या माहितीवरून अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक बनून संशयितांशी संपर्क केला. यानुसार इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी मंदिर परिसरात भेटण्याचे ठरले. मात्र त्यादिवशी हा प्लॅन फिस्कटला. त्या दिवशी संशयितांनी बनावट ग्राहकांना कॉल करून इगतपुरी तालुक्यातीलच उभाडे गावाजवळ भेटण्याचे ठरले.
यावेळी शहापूरचे उपवनसंरक्षक वसंत घुले यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. यावेळी उभाडे गावाजवळ जाऊन संशयित आरोपीशी ग्राहक बनून त्यांना सात जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून बिबट्या वन्य प्राण्यांचे कातडे, एक नाग आणि चार दुचाकी त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
या कारवाईत काळू सोमा भगत (वय ३६, भावली), अशोक सोमा मेंगाळ (वय, २९ भावली), योगेश अंदाडे (वय, २६ फांगुळ गव्हाण), मुकुंदा सराई(वय, ५५, अस्वली हर्ष), गोटीराम गवारी (वय, ३४ सामोडी), रघुनाथ सातपुते (वय, ३४ मोखाडा) व अर्जुन पानेडा (वय २८) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संबंधित संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.