मुंबई नाकास्थित हॉस्पिटलमधील बी स्कॅन मशीन गायब

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील सोनोग्राफी सेंटर तसेच गर्भपात केंद्र तपासणीची मोहीम गेल्या तीन दिवसांपासून हाती घेतली आहे. या तपासणीत मुंबई नाका येथील एका रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन गायब केल्याची बाब उघडकीस आली असून, मनपाने सबंधितांविरुद्ध मुंबई नाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, याबाबत माहिती डॉ. नागरगोजे यांनी दिली आहे.

दरम्यान राज्यातील बीड, वर्ष परिसरात स्त्रीभ्रूण हत्येच्या घटना उघडकीस आल्यानंतर आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर अआरोग्य प्रशासनाने याबाबत तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार नाशिक महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागामार्फत अचानकपणे गोपनीय पद्धतीने शहरातील सोनोग्राफी सेंटर आणि गर्भपात केंद्राची तपासणी करण्यासाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या तपासणी दरम्यान मुंबई नाका येथील वासन आय केअरच्या नावाने नोंदणी असलेले बी स्कॅन हे मशीन गायब असल्याची बाब उघडकीस आली आहे.

मुंबई नाका येथील वासन आय केअर च्या ठिकाणी लागणारे बेस कॅम्प सोनोग्राफी मशीन हे नोंदणीकृत होते. या दवाखान्यातील प्रतिनिधींच्या नावे हे मशीन होते. तपासणी दरम्यान त्यांना वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन तीन वेळा आमचे पथक या ठिकाणी पाहणीसाठी गेले. मात्र सदर ठिकाणी सोनोग्राफी मशीन आढळून आले नाही. परंतु आपण जी सोनोग्राफी मशीन ची परवानगी दिली होती, मात्र या संस्थेकडून किंवा दवाखान्याकडून मशीन हलवण्यासंदर्भात किंवा स्थलांतर करण्यासंदर्भात कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे सदर मशीनचा ठावठिकाणा न लागल्यामुळे आम्ही मुंबई नाका पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पुढील तपास करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान वासन आय केअरच्या नावे नोंदणी असलेल्या व परवानगी दिलेले मशीन गायब झाल्याने अनेक तर्कवितर्क काढण्यात येत असून, पोलिस तपासात अनेक बाबी उघड होण्याची शक्यता आहे. शहरातील अद्याप निम्म्याहून अधिक सोनोग्राफी सेंटर तसेच गर्भपात केंद्रांची तपासणी बाकी आहे. तपासणी धडक मोहीम पूर्ण झाल्यानंतर त्यासंदर्भातील अहवाल आरोग्य खात्याकडे सादर केला जाणार असल्याची माहिती डॉ. नागरगोजे यांनी दिली.