झाडांची मत घ्यायची असते तर एकही झाडं तोडलं गेलं नसत !

नाशिक । प्रतिनिधी

झाड म्हणजे तपश्चचर्येला बसलेले ऋषीमुनी आहेत, ते मानवजातीसाठी बसलेले आहेत, त्याला तुम्ही मारणार का? या वटवृक्षांवर चारशे प्रकारचे पक्षी प्राणी राहतात, त्यांचा अधिवास संपविणार का? त्यांच्या घरावर बॉम्ब टाकल्यासारखे आहे? आयुक्तांनी याचा विचार करावा , नाशिककरांची एकी असेल तर त्यांना हा निर्णय बदलवाच लागेल, अशी प्रतिक्रया अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिली आहे.

अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज नाशिक मध्ये असलेल्या २०० वर्षे जुन्या वटवृक्षाला भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून हा वटवृक्ष चांगलाच चर्चेत आला होता. मायको सर्कल ते त्रिमूर्ती चौक दरम्यान जो उड्डाण पूल होत आहे. त्या उड्डाण पुलात या वटवृक्षासह इतर ही झाडांची कत्तल होणार होती. मात्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही पाहणी करून ही झाड न तोडण्याचे आदेश दिले. उड्डाण पुला संदर्भात इतर प्लॅन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज या ठिकणी भेट देत प्रशासनाला धारेवर धरले.

ते यावेळी म्हणाले कि, झाड म्हणजे तपश्चचर्येला बसलेले ऋषीमुनी आहेत, ते मानवजातीसाठी बसलेले आहेत, त्याला तुम्ही मारणार का? या वटवृक्षांवर चारशे प्रकारचे पक्षी प्राणी राहतात, त्यांचा अधिवास संपविणार का? याबाबत नाशिक प्रशासनाने विचार करावा, त्यासोबत इतर पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यात यावा… तसेच नाशिकरांची एकी असेल तर त्यांना हा निर्णय बदलवाच लागेल .. असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले कि, देशात अनेक जुनी म्हणजेच देशी वृक्षांची तोड करून विदेशी वृक्षांची लागवड केली जाते आहे. त्यामुळे आपण जरा मागे जाऊया, वाड वडलांच्या गोष्टी ऐकुया, आपली जी जुनी झाड आहेत, त्यांचं जतन करूया, यासाठी प्रशासनाने अडवणूक करता कामा नये, नाशिकमधील पर्यावरण प्रेमी अगदी निस्वार्थीपणे काम करीत आहेत. त्यामुळे प्रशासनाने वाहतुकीसाठी दुसरा पर्याय शोधणे आवश्यक आहे, झाड तोडता कामा नये असा नियम कोर्टाचा असून आयुक्तांनी याचा नीट विचार करावा असे ते म्हणाले.

ब्रम्हगिरीबाबत ते म्हणाले कि, नाशिकसह राज्यातील अनेक संस्था ब्रम्हगिरी साठी झटत आहेत. यासाठी आपल्या घरातूनच सुरवात केली पाहिजे. ब्रम्हगिरी रांगेत मुलांचे वाढदिवस साजरे करून झाड लावली पाहिजेत , मुलांमध्ये आतापासूनच झाड वाचविण्यासाठीची श्रद्धा रुजविली गेली पाहिजे. मुळात झाडांची मत घ्यायची असते तर हजारो, लाखो झाड वाचली असती. मात्र झाड आपला राग व्यक्त करत नाही.. त्यामुळे आपल्यासारखे वृक्ष प्रेमी पुढे येऊन झाडांचे म्हणणे मांडतो. नाशिककरांचे कौतुक करावे लागेल, त्यांनी एकजूट दाखवून हि मोहीम सुरु ठेवली. या वृक्ष मोहिमेला सह्याद्री देवराईचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.