नाशिक । प्रतिनिधी
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या लेखी परीक्षा या ऑफलाईनच होतील, त्यात कोणताही बदल होणार नसल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाने आज पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षांचा अभ्यास आणि त्याची तयारी करावी असे आवाहनही त्यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना केले.
काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी शिक्षण मंत्र्याच्या हजारोंच्या संख्येने आलेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. त्यामुळे राज्यभर चर्चाना उधाण आले होते. त्यावर आज राज्य शिक्षण मंडळाने आपला निर्णय जाहीर केला आहे.
दरम्यान या परीक्षांसंदर्भात आज सकाळी साडेअकरा वाजता महाराष्ट्र राज्य मंडळाकडून पुण्यात पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती. यावेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाने दिली आहे. प्रत्येक शाळेत परीक्षा उपकेंद्र दिले जाणार असून ६० मार्काचा पेपर साठी पंधरा मिनिटे तर १०० मार्काचा पेपर साठी अर्धा तास वेळ वाढवून देण्यात आला आहे. दहावीची परीक्षा १५ मार्च ते चार एप्रिल या काळात ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहे. १५ पेक्षा कमी परीक्षार्थी असेल तर त्या शाळेत केंद्र न देता जवळच्या शाळेत त्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जावे लागणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तेथे परीक्षा केंद्र असा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना काळात लेखनाची सवय तुटल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळ वाढवून देण्यात आला आहे. सोळा लाख २५ हजार विद्यार्थी दहावीची तर १४ लाख ७२ हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.