हे वाचून तुमचं काळीज तीळ-तीळ तुटेल, नाशिकमधील पोलीस बापाची कथा

नाशिक । प्रतिनिधी

मुलगा झाल्यावर सर्वांना आनंद होत असतो. तसा मलाही झाला. मात्र नियतीच्या मनात मात्र वेगळंच होत… लाडाकोडानं वाढवलेला पोरगा हाताबाहेर गेला…. हे बोल आहेत नाशिकमधील एका पोलीस बापाचे.. ! पोलीस हवालदार गणपत काकड यांनी आपल्या मुलाबद्दल लेख प्रपंच लिहून सगळ्याच्या हृदयाला हात घातला आहे.

मागील काही महिन्यापूर्वी नाशिक शहरातील म्हसरूळ परिसरात एका पोलीस पुत्राचा खून झाला. मित्रांच्या जुन्या वादातून हा खून झाला. त्यामुळे पुढील काही दिवस या परिसरात दहशतीचे वातावरण होते. तर खून झालेल्या तरुण हा पोलीस पुत्र असल्याचे पोलीस तपासात पुढे आले होते. आता सोशल मीडियावर याच संदर्भात एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. या तरुणाचे वडील पोलीस हवालदार गणपत काकड यांनी एका पोस्टद्वारे आपल्या मुलाची करुण कहाणी मांडली आहे.

“माझं काय चुकलं” पोलीस हवालदार श्री. गणपत काकड राहणार मखमलाबाद यांनी त्यांच्या मयत मुलाबद्दल लिहिलेला लेख !

माझा मुलगा कै. प्रवीण गणपत काकड याचा बावीस वर्षांपूर्वी जन्म झाला. मुलगा झाल्यावर सर्वांना आनंद होत असतो. माझा जन्म झाल्यावर माझ्या विडी कामगार आई-वडिलांना देखील आनंद झाला असेल. आई-वडील मुलांचे देव असतात. त्याचा जन्म झाल्यावर शाळेत जाईपर्यंत त्याचे भरपूर लाड पुरवले जातात. मीदेखील त्याचे भरपूर लाड केले. मला त्याचे लाड पुरवणे अशक्य नव्हते. माझी नोकरी पोलीसची असल्याकारणाने मला त्याचा अभ्यास घेणे घरामध्ये शक्य नव्हते. कारण मला रात्रपाळी दिवस पाळी म्हणून मी त्यास जंगलीदास महाराज संस्था कोकम ठाणे तालुका कोपरगाव या ठिकाणी दुसरी ते नववी पर्यंत पाठविले. तेथे भरपूर खर्च केला. त्यानंतर तो दहावीची परीक्षा कसाबसा पास झाला.

त्यानंतर नासिक येथे के टी एच एम कॉलेज येथे अकरावीला टाकले. तो शिकत असताना त्यास भीमराव (काळीपिवळी वाला ठाणगावकर) यास बरोबर घेऊन एफ झेड ही गाडी घेऊन दिली. परंतु मुलगा कॉलेजला टवाळक्या करू लागला. मोटरसायकलचा बोऱ्या वाजवला. गाडीचा अपघात करून पूर्ण गाडी उध्वस्त करून टाकली. त्यात साठ हजार रुपये लॉस केले, सिगारेट पिऊ लागला लागला. बियर पिऊ लागला. त्यामुळे त्याचे फुप्फुसाला गाठ येऊन फुफ्फुसाचा अटॅक आला. तो सुधारेल या आशेवर मी त्यास मुंबई हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन गेलो. त्या ठिकाणी सुमारे तीन लाख रुपये खर्च केले व त्यास व्यवस्थित करून नाशिकला आणले. परंतु गड्याने काही ऐकले नाही. त्याचे उद्योग चालूच राहिले.

तो सुधारेल म्हणून त्यास वज्रेश्वरी जिल्हा ठाणे या ठिकाणी सुधारगृहात दीड वर्ष ठेवले तेथे दीड लाख रुपये खर्च केला.आता सुधारेल या आशेवर नाशिकला आणले परंतु गडी काही थांबेना म्हणून त्यास परत भारतामधील सुप्रसिद्ध सुधारगृह म्हणजे मुक्तांगण संस्था पुणे येथे येथेही दीड वर्ष ठेवण्यात आले. तेथील संचालक मंडळाला भेटून त्यास मास्तर म्हणून नोकरीस ठेवण्यास संस्था तयार केली ती संस्था तयार झाली, परंतु याला काही तेथे करमेना. परत त्याने नाशिकची वाट धरली. नासिकला ही भाऊ काही गप्प बसेना. मित्रांचे संगतीने दारू पिणे, सिगारेट ओढणे, नाना तर्‍हेचे व्यसने लावून घेतली. दादागीरी करणे, मारामारी करणे हे प्रकार चालू ठेवले.

मी अतिशय चिंताग्रस्त होऊन चिंता रोगी बनलो. माझी झोप उडाली. माझे पोलीस खात्यातील वीस-पंचवीस पोलीस अधिकाऱ्यांनी तो गणपत काकड.चा मुलगा म्हणून वेळोवेळी समजावून सांगितले तरीदेखील त्याचा त्याचेवर कुठलाही परिणाम झाला नाही. त्यानंतर मी रघुनाथ रामचंद्र काकड (भाऊ) यास ही गोष्ट बोलून दाखवली त्याने मला शब्द दिला तो कसा सुधारत नाही ते मी बघतो मी त्यास मुंबईला घेऊन जातो. म्हणून रघु भाऊ मुंबईला घेऊन गेला. वर्ष दीड वर्ष रघु भाऊ ने त्याची अतिशय चांगल्या पद्धतीने सोय केली. परंतु तेथून तो नाशिकला पळून आला.

मी सर्वांमध्ये ताठ मानेने खंबीर पणे उभा राहणारा मी मांजर बनलो. मला काही सुचेना. हँग झालो मी. जर माझे जागेवर दुसरा कोणी असता तर त्याची काय परिस्थिती झाली असती ते सांगायला नको. जवळजवळ सहा सात वर्ष मी तणावाखाली राहत गेलो. झोप उडाली. काय करावं ते कळेना मी पोलीस आहे मी त्या खात्यात काम करतोय. आपल्या बापाला कोण काय बोलेल याबाबतीत त्याने कुठलीही लाज बाळगली नाही. मुलगा सुधारेल या भावनेने अनेक वेगवेगळे प्रयत्न केले नागबली केली, पूजाअर्चा केल्या, परंतु त्याच्यावर काहीही फरक पडला नाही.

शेवटी वैतागून मी हात जोडले व त्यास स्थानबद्ध करून एक वर्षासाठी सेंट्रल जेल ची हवा खायला लावली. स्थानबद्ध तेचा काळ संपल्यावर परत तो घरी आला. व त्याचे लफडे चालूच राहिले. तो दारूच्या आहारी गेला. दुसऱ्याला ठार मारण्याच्या धमक्या देऊ लागला. गुन्हे करू लागला. ज्या भागात मी एकवीस वर्ष राहत आहे. त्या ठिकाणी मला अजून पुर्ण 21 कुटुंबे ओळखत नाही. परंतु त्यास पूर्ण पंचवटी परिसर ओळखू लागला. बाप या नात्याने भरपूर प्रयत्न केले. मुलगा गेल्याचे दुःख आहेच, परंतु बापाचे न ऐकल्याने अति शहाणा समजल्याने, अति गर्व केल्याने माज केल्याने शेवटी करावे तसे भरावे, अशा पद्धतीने जीवनाच्या या वाटेवरील चांगलं आयुष्य बरबाद करून टाकून स्वर्गवासी झाला.

अति तेथे माती म्हणून मित्रांनो सावधानता बाळगा, वाईट मार्गाला जाऊ नका, कष्ट करा, आई-वडिलांच्या आज्ञेत राहा, आई-वडील हे देव आहे, आई-वडिलांचा कधी विश्वास घात करू नका.जो आई-वडिलांकडे दुर्लक्ष करतो, त्रास देतो त्याचा शेवट फार वाईट असतो, म्हणून सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे. माझ्या बाबतीत जे घडलं ते मी उपभोगलं असं कुणाच्याही नशिबी येऊ नये. हात जोडून विनंती आहे वाममार्गाला जाऊ नका. माझ्यावर आलेली परिस्थिती कुठल्या दुष्मनावर देखील येऊ नये. म्हणून “माझं काय चुकलं” हा लेख लिहिला आहे, धन्यवाद!