नाशिक पोलीस आयुक्तालयाचे ९४ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक पोलीस (Nashik police) दलातही कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयातील ९४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरांसह जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यातच आता नाशिक पोलीस प्रशासनांतही कोरोनाचा शिरकाव झाल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीत ९४ पोलीस कोरोना बाधित आढळून आले आहेत तर अनेक पोलीस कर्मचारी कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

कोरोनाची लग्न झालेल्यापैकी आठ ते दहा पोलिसांनी कोरोनावर मात केली असून ते कर्तव्यावर हजरही झाले आहेत. तर उर्वरित पोलीस कर्मचारी गृह विलगीकरणात उपचार घेतले जात आहेत. तसेच पोलीस मुख्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये सुमारे दहा ते पंधरा कर्मचारी उपचारासाठी दाखल आहेत.

दरम्यान एवढया मोठ्या संख्येने पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयासह सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सर्व अधिकारी कर्मचारी यांची अँटीजन चाचणी केली जात आहे. तर सर्वच पोलीस ठाण्यांत कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. तसेच विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.