सुरगाणा नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा

सुरगाणा । प्रतिनिधी
सुरगाणा नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असून भरत वाघमारे यांची नगराध्यक्ष पदासाठी वर्णी लागली आहे. तर उपाध्यक्ष पदी माकपच्या माधवी राहुल थोरात यांची चिठ्ठी द्वारे निवड करण्यात आली आहे.

दरम्यान सुरगाणा नगरपंचायतीत भाजप ८, शिवसेना ६, माकप २ व राष्ट्रवादी काँग्रेस १ याप्रमाणे नगरसेवक आहेत. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून विजय कानडे व शिवसेनेने कडून भारत वाघमारे यांनी नामांकन पत्र दाखल केले होते. हे पद मिळविण्यासाठी दोन्ही कडून जोरदार प्रयत्न सुरू असताना प्रथमच निवडणूक लढवत विजय प्राप्त केलेल्या भाजपच्या नगरसेविका काशीबाई पवार यांचे निधन झाल्याची वार्ता आली आणि शहरात शोककळा पसरली.

त्यानंतर आज नगराध्यक्ष पदाची चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली आहे. या निवडप्रक्रियेत शिवसेनेचा वरचष्मा राहिला आहे. तर माकपने दोन जागा आणून देखील उपनगराध्यक्ष पदाची माळ गळ्यात घातली आहे. शिवसेनेचे भरत वाघमारे नगराध्यक्ष तर माकपच्या माधवी राहुल थोरात यांची उप नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.