नाशिकमधील पर्यावरण प्रेमींचा ‘ट्री व्हॅलेंटाईन डे’

नाशिक | प्रतिनिधी

वडनेरगाव परिसरात ५१ झाडांची बेकायदेशीर कत्तल होऊनही पोलिस व महापालिकेकडून ठोस कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ पर्यावरण प्रेमींनी येथील झाडांना प्रेम अलिंगन देऊन अनोखा ट्री व्हॅलेन्टाईन डे साजरा केला.

कर्तव्यशील सामाजिक संस्थेचे वैभव देशमुख, नाशिक नागरी कृती समितीच्या अश्विनी भट, नितीन मुर्तडक, सागर शिंदे, अलंकार डगळे, पवन पाटील, मंगेश तारगे, अमित कुलकर्णी आदींसह विविध संस्थाचे प्रतिनिधी पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.

नागरिक व पर्यावरणासाठी वृक्षांचे असलेले महत्व याबाबत वडनेरगेटला जनप्रबोधन करण्यात आले. झाडांना अलिंगन देऊन त्यांच्या सुरक्षा व वृध्दीसाठी प्रार्थना करण्यात आली. खोट्या विकासाच्या नावाखाली वृक्ष तोडणा-यांना सदबुध्दी देवो, अशी प्रार्थना वडनेरगावातील मारूती मंदिरात करण्यात आली. नियमित व बेकायदेशीरपणे झाडे तोडणा-या या सराईत ठेकेदाराला महापालिकेने वीस लाखाच्या दंडाची नोटीस देऊनही कारवाई होत नसल्याबद्दल वडनेरच्या नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

वैभव देशमुख म्हणाले की, आम्ही याच परिसरात ५१ देशी झाडे लाऊन जगवणार असून देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांची नावे या झाडांना देणार आहोत. अश्विनी भट म्हणाल्या की, शहरात जेथे वृक्षतोड झाली असेल तेथे दरवर्षी झाडांना पुष्प अर्पण करून व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाणार आहे.

विकासाला आमचा विरोध नाही, मात्र कायद्याच्या चौकटीत तो असावा, तोडलेल्या झाडांच्या बदल्यात नवीन झाडे लावावीत. महापालिकेचे विभागीय अधिकारी दिलीप मेनकर, उद्यान निरीक्षक एजाज शेख, उपनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलेश माईनकर यांना गुलाब व वृक्ष देऊन ठोस कारवाईची मागणी केली जाणार आहे.