महिला शेतात एकटी असल्याचा फायदा घेत अंगावरील दागिने ओरबाडून केली हत्या

नाशिक : जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना मागील काही दिवसांपासून वाढल्या आहेत. एक महिला शेतात एकटी काम करत असल्याचा फायदा घेत महिलेच्या अंगावरील दागिने ओरबाडत तिचा गळा आवळून खून केला आहे. ही धक्कादायक घटना शनिवारी येवला तालुक्यात घडली आहे. यामुळे आता नाशकात नागरिक सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोन्याच्या दागिन्यांसाठी ही हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव आहेर यांच्या आई तालुक्यातील मुखेड शिवारात नवीन कॅनॉललगत असलेल्या शेतात काम करत होती. दरम्यान, त्यांचा मृतदेह आढळला होता. त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने ओरबाडून नेले होते. त्यांचा उपरण्याने गळा आवळून खून केला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडली होती.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी घटनास्थळी भेट देवून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पथक नेमण्यात आले होते. पोलिसांनी आपली चक्र फिरवत या प्रकरणाचा खुलासा केला असून एकास अटक केली आहे.

दिली खुनाची कबुली

या घटनेतील संशयित आरोपी निलेश गीते हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध येवला पोलिसांत विविध गुन्हे दाखल आहेत. घटनेच्या दिवशी मुखेड गावचा आठवडे बाजार असल्याने यातील संशयित हा आठवडे बाजारात आला होता. सायंकाळच्या सुमारास तो दुचाकीने मुखेड गावाजवळील नवीन कॅनॉल रोडने जात असतांना, त्यास ही महिला शेतात एकटीच काम करत असल्याची दिसली. तेव्हा त्याने महिलेशी झटापट करून तीचा उपरण्याने गळा आवळून खून केल्याची कबुली त्यांनी पोलिसांत दिली. त्याचबरोबर महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत व कानातील कर्णफुले जबरीने चोरून नेल्याचे सांगितले.