नाशिककरांच्या जीवाची लाही लाही! तापमान ३९.०३ अंशावर!

नाशिक । प्रतिनिधी

गेल्या चार दिवसांपासून उन्हाचा चटका बसत असून नाशिककरांच्या जीवाची लाही लाही झाल्याचे पाहायला मिळत आहे. कालचे कमाल तपमान ३९.३℃ अंशावर असून उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे शहरात उष्म्याने कहर केला आहे. यामुळे नागरिक घराबाहेर पाडण्याचे टाळत आहे.

यंदाचा थंडीचा कहर अनुभवल्यानंतर नाशिककर उन्हाळ्यासाठी सज्ज होत असताना मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच सूर्याने आग ओकायला सुरवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून तर सकाळी नऊ वाजल्यापासून डोक्यावर उन्हाचा झळा नाचत असल्याचे नाशिककर अनुभवत आहेत. सोमवारापासून तापमानात कमालीची वाढ झाली आहे. सोमवारी हा पारा ३६.२℃, मंगळवारी ३७.१℃, बुधवारी ३९.०℃ होता, तर काल गुरुवारी ३९. ०३ ℃ ची वाढ झाली. सोमवारपासून सातत्याने तपमानाचा पारा चढता राहत असून पारा ३९.३ वर स्थिरावत असल्याने वातावरणात उष्मा कायम आहे. गुरुवारी (दि.१७) ३९.३ अंश इतक्या कमाल तपमानाची नोंद हवामान खात्याकडून करण्यात आली.

वाढत्या तपमानामुळे नाशिककरांना उन्हाचा तीव्र चटका बसत असून उष्म्याच्या त्रासाने नागरिक हैराण झाले आहे. दिवसभर शहरातील सर्वच खासगी कार्यालयांसह दुकानांमध्येही वातानुकूलित यंत्रांच्या वापरावर भर दिला जात आहे. त्याचप्रमाणे खासगी क्षेत्रातील नोकरदारांसह बाळगोपाळांकडून शीतपेय व थंड फळहार करून शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न नाशिककरांकडून केला जात आहे. त्यामुळे एप्रिल, मे आणखी दोन महिने उन्हाच्या झळा जाणवणार असल्याने शीतपेयांना मागणी वाढणार असल्याचे दिसते.

दरम्यान आज धुळवडीचा दिवस असल्याने शासकीय कार्यालये, खाजगी शॉप्स देखील बंद असल्याचे दिसून आले. सकाळी जॉगिंग करणाऱ्यांची गर्दी दिसून आली मात्र दुपारनंतर पारा वाढल्याने नाशिककरांनी घरात राहणे पसंत केल्याचे दिसून आले. यामुळे खासगी वाहतूककी बरोबरच सिटीलींक बसेसमध्येही तुरळक गर्दी दिसून आली. वाढत्या उष्म्याबरोबरच वाराही बंद असल्यामुळे नागरिकांच्या जीवाची लाही लाही होत होती.