नाशिक | प्रतिनिधी
येथील नाशिकरोड परिसरातील चेहेडी पंपिंग मधील संगमेश्वर नगरमध्ये राहणाऱ्या भारती विनोद बायस यांच्या घरात काही सराईतांनी धारदार शस्त्र व कोयते घेऊन घरावर हल्ला चढवत परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. काल रात्री अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.
याबाबत अधिक माहीती अशी की नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चेहडी पंपिंग जवळील संगमेश्वर नगर मध्ये राहणारी भारती विनोद बायस या महिलेच्या घरात रात्रीच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी दार ठोठावत प्रवेश केला. यावेळी प्रवेश करताच खिडकीच्या काचा फोडण्यात आल्या. यावेळी महिलेसह तिच्या मुलगा मागच्या दरवाजाने घरातून पळ काढला.
दरम्यान घरात घुसलेल्या संशयितांनी घरातील कपाटाची काच, डब्बे, टीव्ही, लाकडी फर्निचर यांची तोडफोड करून नासधूस केली. तिथून निघत असताना संशयितांनी इतर घरांच्या देखील काचा फोडल्या. तसेच रस्त्यावर उभी असलेल्या रिक्षाची देखील काच फोडली. तसेच मोठमोठ्याने शिवीगाळ करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला
याबाबत रात्री उशिरा सागर कोकणे, प्रशांत जाधव व हुसेन नामक तीन संशयितांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास नाशिकरोड पोलिस करत आहेत.