ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजरसह दोघांना दीड वर्षाचा कारावास..!

नाशिक : उद्धव ठाकरे गटाचे नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे अडचणीत आले आहे. महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह इतर दोन जणांना दीड वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली असून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी न्यायालयाने सुधाकर बडगुजर आणि इतर दोन जणांवर ही कारवाई केली आहे.

याबद्दल अधिक माहिती अशी की, सन २०१४ साली लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान या तिन्ही आरोपींच्या वाहनात शस्त्र आढळून आले होते. याची विचारपूस करताना तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त आणि अंबड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक यांच्या कामात अडथळा आणल्या प्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता फेब्रुवारी २०२३ मध्ये हे प्रकरण निकाली लागले असून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह दोन जणांना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नाशिकच्या राजकीय वर्तुळातील ही मोठी घडामोड समोर येत आहे.

ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आणि इतर दोघांविरुद्ध गुन्हा सिद्ध

ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आणि इतर दोघांविरुद्ध हा गुन्हा सिद्ध झाला असून, कलम ३५३ प्रमाणे एक वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड, तसेच कलम ३७ आणि १३५ प्रमाणे सहा महिने कारावास आणि प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आल्याची माहिती सरकारी वकील रवींद्र निकम यांनी दिली.

सरकारी वकील रवींद्र निकम

मात्र, घटना घडली त्या दिवशी सरकारी कामात अडथळा आणल्याचे एकूण तेरा गुन्हे दाखल झाले होते. या इतर गुन्ह्यातील हे सर्व दोषी निर्दोष सुटले आणि आम्हालाच शिक्षा झाली असल्याचा दावा ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला. या निर्णयाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात अपील करणार असल्याची माहिती ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आली. नाशिकच्या उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी दत्ता गायकवाड यांनी उच्च न्यायालयात अपील करणार असल्याची माहिती दिली असून आता या प्रकरणी नाशिकच्या राजकीय वर्तुळात की घडामोडी घडतात याकडे लक्ष लागून असणार आहे.