महागाईचा कहर.. आता डाळ-भात महागणार

दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. ती कमी होण्याचे नावच घेत नाही, उलट ती अजूनच वाढत चालली आहे. आता आपला मुख्य आहार ‘डाळ भात’ हा सर्वसामान्यांच्या खिशाच्या आवाक्या बाहेर जाण्याचे चिन्ह दिसत आहे. यंदा डाळ आणि भात या दोन्हीच्या लागवडीत मोठी घट झालेली आहे. त्यामुळे डाळ आणि भाताच्या दारात लवकरच वाढ होणार असल्याची शक्यता आहे. आधीच पेट्रोल-डिझेल, गॅस यांच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.त्यात जीएसटी परिषदेने खाद्यांन्न व अन्नधान्य जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतल्याने पॅकबंद दही, लस्सी, ताक, खाण्याचे पदार्थ, अन्नधान्य इत्यादी गोष्टींचे दर वाढले आहेत. आणि अश्यातच लागवड कमी झाल्याने डाळ आणि भाताचा देखील तुटवडा निर्माण होणार आहे. त्याचा परिणाम डाळ आणि भात दोन्हीचे दर महागणार आहेत.

कृषी मंत्र्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १५ जुलैपर्यंत भाताची लागवड १७.४ टक्क्यांनी कमी झाली. आत्तापर्यंत केवळ डाळ- तांदूळाचेच भाव कमी होते. मात्र लवकरच ही परिस्थिती बदलणार असून त्यांच्याही दरात वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. आतापर्यंतच्या उच्चांकावरून ५२ टक्के इतकी घसरण झालेल्या तूर डाळीच्या दरात २०२२ सालात आत्तापर्यंत ६.५ टक्के तेजी आली आहे.
सोबतच २०२१-२०२२ या वर्षात धानाची सरकारी खरेदी घटल्याचे दिसून आले आहे. या वर्षातील रब्बी हंगामात ४४ लाख टन धान खरेदी झाली आहे. २०२०-२०२१ साली हा आकडा ६६ लाख होता. तर त्यापूर्वी म्हणजेच २०१९-२०२० साली ८० लाख टन धान खरेदी झाली होती. २०२०-२०२१ साली एकूण धान खरेदीचा आकडा १३५ लाख टन इतका होता. मात्र यंदा (२०२१-२०२२ वर्षात) धान खरेदीत हा आकडा गाठला जाईल, याची शक्यता कमी दिसत आहे.

दरम्यान पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार व मध्य प्रदेश या राज्यांमधील भाताच्या लागवडीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 31 टक्के घट झाल्याचे दिसून आले. तसेच तूर डाळीच्या लागवडीतही आत्तापर्यंत 26 टक्के घट झाल्याचे नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच डाळींच्या दारात आणि भाताच्या दारात देखील वाढ होणार आहे.