राज्य सरकार कोणत्याही अल्टिमेटमला जुमानत नाही!

मुंबई / प्रतिनिधी

मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thakare) यांच्या भोंग्याबाबतच्या अल्टिमेंटमला राज्य सरकार जुमानत नाही. जे कायदेशीर आहे त्याच गोष्टी होतील. बेकायदेशीर गोष्टींना राज्यात थारा नाही. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न कुणी करत असतील तर ते भ्रमात आहेत, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी विरोधकांना सुनावले.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip valase patil) हे संयमी आणि सक्षम नेते आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thakare) हेही तितकेच सक्षम आणि मजबूत नेते आहेत. या महाविकास आघाडीचे मार्गदर्शक शरद पवार (Sharad pawar)हे सर्वात अनुभवी नेते आणि प्रशासक आहे. त्यामुळे या राज्यात कोणी अल्टिमेटम देऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असतील तर ते भ्रमात आहेत. या राज्यात असे काही होऊ शकत नाही. कारण या राज्यातील जनताच सूज्ञ आहे. या राज्यातील फुले विरुद्ध टिळक हा वाद कोणी लावत असेल तर तो निरर्थक ठरेल, असेही राऊत यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

एखाद्या राजकीय पक्षाला राज्यातील शांतता बिघडवायची असेल त्यासाठी त्यांनी कुणाला सुपारी दिली असेल तर अशा लोकांना. राज्य सरकारने शोधले पाहिजे. काही लोकांना महाराष्ट्रातील जनतेने दूर केले आहे. त्याचे वैफल्य ते इतरांच्या माध्यमातून काढत आहेत. याला शौर्य म्हणत नाहीत, असा टोला राऊत यांनी भाजपचे नाव न घेता लागवला.

जे आमच्याविरोधात समोरून लढू शकत नाही. ज्यांच्याकडे हिंमत नाही ते लोक असे छोटे मोठे पक्ष पकडतात आणि आमच्यावर हल्ले करतात. पण अशा हल्ल्यांचा आम्हाला फरक पडत नाही. अशा हल्ल्यांना तोंड देण्यास आम्ही सक्षम आहोत, असेही राऊत म्हणाले.