शेतकऱ्यांच्या जमिनीला कोणी हात लावणार नाही – छगन भुजबळ

नाशिक । प्रतिनिधी

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्राच्या भूमीवर पडलेला प्रत्येक थेंब पूर्वेकडे वळविला जाईल. आपल्याकडचे जे पाणी गुजरातला जात आहे ते आपल्याकडे आणले तर नाशिकचाच नाही तर मराठवाड्याचा देखील प्रश्न सुटेल एक थेंब देखील महाराष्ट्रातून गुजरातला देऊ देणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच संपूर्ण पैसे दिल्याशिवाय शेतकऱ्यांच्या जमिनीला कोणी हाथ लावणार नाही याची काळजी आम्ही घेऊ तसेच रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू तसेच जिल्ह्यातील बंद साखर कारखाने सुरू करण्यास प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रातील एक अजातशत्रू व्यक्तीमत्व म्हणून त्यांची विशेष श्रीराम शेटे ओळख आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक, कृषी क्षेत्रात त्यांचा दबदबा असून राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात अनेक कार्यकर्ते घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जडणघडणीत देखील त्यांचा बहुमुल्य वाटा असून नाशिक जिल्ह्यातील सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. जिल्ह्यातील कृषी आणि सहकार क्षेत्रात त्यांनी अतिशय महत्वपूर्ण कामे केलेली आहे.

नाशिक जिल्ह्यात सहकारी तत्वावर कादवा सहकारी साखर कारखाना अतिशय यशस्वीपणे सुरु राहण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे. कादवा सहकारी साखर कारखाना ज्या परिस्थिती मध्ये त्यांनी घेतला आणि तो जिथे नेऊन ठेवला ते महत्वपूर्ण आहे. जिल्ह्यातील सर्व बंद केलेले कारखाने सुरू करण्यासाठी श्रीराम शेटे याना सल्लागार म्हणून नियुक्ती करावी असे सांगत श्रीराम शेटे हे नेहमी एकनिष्ठपणे पवार साहेबांच्या सोबतच राहिले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. नरहरी झिरवाळ यांच्या रूपाने अभ्यासू उपाध्यक्ष सभागृहाला मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.