एकजुट झाली, अन गावाचं नशीब बदललं !

नाशिक । प्रतिनिधी

पाणी असूनही वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या गावात पाणी आले आहे. पालघर आणि त्र्यंबक तालुक्यातील गावांनी एकजूट करीत गावाचं नशीब बदललं आहे. मोखाडा येथील २० तर त्र्यंबक तालुक्यातील ०७ गावांना सौर ऊर्जा प्रकल्पामुळे पाण्याची समस्या सुटली आहे.

मोखाडा व त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रातील अतिवृष्टी होणारे तालुके आहेत. परंतु जमिनीची भौगोलिक रचना बेसाल्ट खडकाची असल्यामुळे जमिनीत पाणी मुरत नाही. तर ते वेगाने वाहून जाते. तसेच गाव व शेती उंच भागात असल्यामुळे नदीतून वाहणारे पाणी उचलणे किंवा साठवण तलावातील पाणी उचलणे खर्चिक होते. सिंगल फेज वीज कनेक्शन असलेल्या गावात मोठे पंप लावणे शक्य होत नाही. मात्र यावर गावकऱ्यांनी एकत्र येत ताहराव केला. अन सौरऊर्जेवर पाणी पाण्याचं ठरलं. डिझेल पंप खर्चिक व प्रदूषण करणारे असल्यामुळे या प्रकल्पाकरिता सौर पंप हा पर्याय निवडला व चेकडॅम मधून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली.

या प्रकल्पातून वैयक्तिक शेतकऱ्याला पाणीपुरवठा न करता, गावातील शेतकऱ्यांचा गट तयार करून गट शेती (सामुदायिक शेती) साठी सुद्धा सोलर पंपाद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार ३ HP ते १२ HP चे पंप वापरण्यात आले आहेत. यातून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी पुरवठा करण्यात आला आहे. सौर उर्जेचा उपयोग करून राबवलेल्या या प्रकल्पात दोन तालुक्यातील एकुण २७ गावांचा समावेश करण्यात आला आहे. प्रकल्पातुन एकुण ९००० हुन अधिक नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व शेतीकरिता सिंचन सुविधेची व्यवस्था निर्माण झाली आहे.

या प्रकल्पाकरीता विविध समाजसेवी संस्थेकडून व उद्योगांकडून व्यवसाईक सामाजिक जबाबदारी निधी अंतर्गत आर्थिक मदत मिळाली आहे. प्रकल्पाची देखभाल पाणी वापर गट स्थापन करून त्यांना प्रशिक्षण देऊन करण्यात येते आहे.