त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा रद्द!

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी

त्र्यंबकेश्वरमधील संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रा उत्सवाची शेकडो वर्षांची परंपरा यंदा कोरोनामुळे खंडित झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता, यंदा हा उत्सव होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

राज्यातील वारकरी संप्रदायात संत निवृत्तीनाथ महाराज यांच मोठे स्थान आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो भाविक नाथ महाराजांच्या यात्रेसाठी राज्य भरातून त्रंबकेश्वर मध्ये दाखल होत असतात. यावर्षी २६ ते २९ जानेवारी दरम्यान हा उत्सव होणार होता. मात्र, यात खंड पडणार आहे.

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रा पौष वद्य एकादशीला भरते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातुन दुरवरुन येणाऱ्या दिंड्या एक महिना, १५ दिवस आधीच येण्याचे नियोजन करतात. मानाच्या दिंड्या पालख्यांना एक महिना अगोदर निमंत्रण द्यावे लागते. यासाठी निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान ट्रस्टला नियोजन करावे लागते.

मात्र यंदाही भाविक, वारकऱ्यांचा हिरमोड झाला असून उत्सव रद्द करण्यात आला आहे. फक्त महापूजा आणि रथ मिरवणूक होणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.