अंबड एमआयडीसीतील ट्रक टर्मिनल अद्यापही प्रलंबित

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरातील औद्योगिक वसाहत असलेल्या अंबड एमआयडीसीतील ट्रक टर्मिनल विकसित करण्याबाबत वारंवार पाठपुरावा करून देखील अद्यापही येथील ट्रक टर्मिनल प्रलंबित आहे. केंद्र व राज्य शासनाने वाहतुकदारांच्या समस्या लक्षात घेऊन या ट्रक टर्मिनलचा सकारात्मक विचार करावा व याठिकाणी आरक्षित असलेल्या भूखंडावर तातडीने ट्रक टर्मिनल विकसित करून वाहतुकदारांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत अध्यक्ष राजेंद्र फड व वरिष्ठ उपाध्यक्ष पी. एम सैनी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व नाशिक एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांना याबाबत निवेदन सादर केले आहे.

नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक महानगरपालिका हद्दीमधील सातपूर,अंबड एमआयडीसी असून याठिकाणी मोठ्याप्रमाणात औद्योगिक कारखाने आहेत. त्यामुळे या परिसरात मोठयाप्रमाणात अवजड वाहतूक होते. याठिकाणी ट्रक टर्मिनलची व्यवस्था नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी राहतात. त्यामुळे याठिकाणी अपघातही मोठ्या प्रमाणात होतात. तसेच गाड्या उभ्या करण्यास जागा नसल्याने वाहतुकदारांना अडचण निर्माण होऊन गाड्या रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केल्यावर नाहक दंड भरावा लागत असल्याने आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे म्हटले आहे.

पुढे म्हटले आहे की, औद्योगिक दृष्ट्या विकसित होणाऱ्या शहरामध्ये नाशिकचा समावेश आहे. या शहरात मोठी गुंतवणूक होऊन शहराचे औद्योगिकीकरणात मोठी भर पडत आहे. शहराचे वाढते औद्योगिक वितरणामुळे व एकुणच चौफेर विकसित होणाऱ्या शहरात विशेषत: औद्योगिक परीसरात ट्रक टर्मिनल असणे हे अत्यंत आवश्यक बाब आहे. ट्रकवरील चालक व क्लीनर हे बाहेर राज्यातील व अत्यंत गरीब परीस्थितीतील असुन ट्रक टर्मिनलच्या ठिकाणी त्यांचे राहण्याची, उपहारगृह, स्वच्छागृह, विश्रांतीगृह, वाहन दुरूस्तीसाठी गँरेज, डीझेल पंप, वजन काटा, स्पेअर पार्ट दुकान, गोडावून, सर्विस स्टेशन, प्रशिक्षण हॉल, प्रथमोपचारसाठी व्यवस्था असावी अशी आमची अनेक वर्षापासुनची मागणी प्रलबिंत आहे.  नाशिक शहरातील आरक्षित ट्रक टर्मिनल विकसित झाल्यास शहरावरील वाहतुकीचा ताण तसेच वाहतुककोंडी सोडविण्यासाठी उपयुक्त ठरेल असे म्हटले आहे.

 
तसेच अंबड ट्रक टर्मिनल विकसित होणेबाबत संघटनेच्यावतीने यापुर्वी वारंवारपाठपुरावा करण्यात आलेला आहे. मात्र अद्यापपर्यंत याठिकाणी ट्रकटर्मिनल उभारण्यासाठी कोणतेही सकारात्मक निर्णय झालेले नाही. यापुर्वी देखील संस्थेच्या वतीने शासन दरबारी पाठपुरावा करण्यात आला होता. परंतु दुर्दैवाने सदरबाबत आजपावेतो कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही. सदर विषय गेले अनेक वर्ष प्रलबिंत आहे. ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित जागेत ट्रक टर्मिनलच उभे रहावे ही संघटनेची व उद्योजकांची मागणी असून त्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात येऊन तातडीने ट्रक टर्मिनल विकसित करण्यात यावे अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेली आहे.