नाशिक । प्रतिनिधी
कळवण तालुक्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत लाखो रुपयांचा अपहार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. येथील एका मुख्याध्यापकानेच हा अपहार केल्याचे खळबळ उडाली आहे.
कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहनदरी येथे हा अपहार झाल्याचे समोर आले आहे. येथील शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक असताना संशयित गोकुळ चव्हाण यांनी हा अपहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हेमंत बच्छाव गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कळवण यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
तक्रारीत म्हटल्याप्रमाणे चव्हाण हे शाळेवर प्रभारी मुख्याध्यापक असताना त्यांनी विदयार्थी लाभाची सुवर्ण महोत्सवी योजनेची ०१ लाख ९६ रुपयांची रक्कम, शालेय पोषण आहाराची २७ हजारांची रक्कम, समग्र शिक्षा अभियान योजनेची २० हजार रुपयांची रक्कम अशी एकूण २ लाख ४३ हजारांचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान ऑक्टोबर २० पासून ते सप्टेंबर २१ हा अपहार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी कळवण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.