कामात कुचराई! जिल्ह्यात जिपच्या दोन ग्रामसेवकांना घरचा रस्ता!

नाशिक । प्रतिनिधी
कामकाजात कुचराई, निधी खर्चात चुकीची माहिती देऊन दिशाभूल करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या दोन ग्रामसेवकांना जागीच निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सिन्नर तालुक्यातील सोनारी येथील ज्ञानोबा बाबुराव रणेर व सुरगाणा येथील अलंगुनचे ग्रामसेवक केशव मंगळू भरसट अशी त्यांची नावे आहेत. भरसट यांनी ग्रामपंचायतीला निधी मिळूनही खर्चाचे नियोजन केले नाही. तसेच मंजूर कामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात कुचराई केली. सुरगाणा तालुक्यातील कुपोषित बालकांसाठी एक मूठ पोषण अभियान राबविण्यास नकार दिला.

त्याचप्रमाणे पेसाअंतर्गत प्राप्त निधी मिळूनही खर्च न करता आदिवासीना योजनांपासून वंचित ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. रणेर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत खोटी माहिती सादर करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. चौदाव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यास कुचराई केली. रणेर मुख्यालयी राहत नसल्याचेही उघडकीस येणे, सार्वजनिक शौचालयांची खोटी माहिती दिल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनाही निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान या दोन्ही नगरसेवकांच्या निलंबनाचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी बजावले आहेत.